पारदर्शकपणे योजनांचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचवा
By admin | Published: April 23, 2015 01:47 AM2015-04-23T01:47:35+5:302015-04-23T01:47:35+5:30
विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांच्या विकासाचे उद्दिष्ट पूर्ण करणे सहज शक्य आहे.
वर्धा : विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांच्या विकासाचे उद्दिष्ट पूर्ण करणे सहज शक्य आहे. यासाठी कल्याणकारी योजना शेवटच्या घटकांपर्यंत पारदर्शकपणे पोहचवा, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी बुधवारी केले. जिल्हा माहिती कार्यालयाच्या माहिती अभियान कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
देवळी पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, पंचायत समितीचे उपसभापती गुलाब डफरे, उप मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र भूयार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. आर. पाटील, सुनील मेसरे, तहसीलदार जितेंद्र कुवर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, कार्यकारी अभियंता शेषराव सहारे, मोहन अग्रवाल यांची उपस्थिती होती. प्रमोद पवार म्हणाले, जिल्हा परिषदेच्या अनेक ग्रामविकासाच्या योजना आहेत. शासनाच्या प्रत्येक विभागाने पुढे येऊन लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे गरजेचे आहे.
राजेंद्र भुयार म्हणाले, राज्यात वर्धा जि. प. ग्रामपंचायतीद्वारे नरेगामार्फत फळबाग योजनेत प्रथम आहे. हा आपल्या जिल्ह्याचा बहुमान आहे. कल्याणकारी योजनांची अचूक माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचविणे आपले कर्तव्य आहे. पाटील यांनी पाणी पुरवठा व स्वच्छ भारत मिशन बाबत सविस्तर माहिती यावेळी दिली. जिल्हाधिक्षक कृषी अधिकारी बऱ्हाटे यांनीही कृषी आणि जलयुक्त शिवार अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच शेषराव सहारे यांनी पाणीपुरवठा, सुनील मसरे यांनी महिला व बालकल्याण आणि पशुसंवर्धनाबाबत डॉ. तापस यांनीही माहिती दिली. उपसभापती गुलाब डफरे, जि. प. सदस्य मोरेश्वर खोडके, अतुल शर्मा यांनीही विचार मांडले.
प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी केले. संचालन विनेश काकडे तर आभार श्याम टरके यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य रोशन वाढवे, उज्ज्वला राऊत, दिनेश धांदे, अशोक सराटे, पंचायत समिती सदस्य बानकर, मेंढे, चौधरी, झाडे, के. आर. बजाज, इमरान राही, सरपंच, ग्रामसेवक आदीं उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)