सुरक्षित प्रवासासाठी वाहतूक नियमांचे पालन गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 09:57 PM2019-02-04T21:57:25+5:302019-02-04T21:57:47+5:30
प्रत्येक वाहन चालकाने स्वत:चे आणि दुसऱ्याच्या जिवाची काळजी घेऊन वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे. सुरक्षीत प्रवासासाठी हे गरजेचे आहे. प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : प्रत्येक वाहन चालकाने स्वत:चे आणि दुसऱ्याच्या जिवाची काळजी घेऊन वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे. सुरक्षीत प्रवासासाठी हे गरजेचे आहे. प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी केले.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने ३० व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन सोमवारी झाले. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे, नगराध्यक्ष अतुल तराळे, सहा प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव, मोटार वाहन निरीक्षक श्याम तिवसकर, विजयकुमार साळुंके, प्रशांत चिंचोळकर, विशाल भोवते, मोटार वाहन निरीक्षक सुरज पवार, मंगेश गवारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. रस्ता सुरक्षा समितीच्या निर्देशानुसार दारू पिऊन वाहन न चालविणे, धोकादायक परिस्थितीत वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईल वर न बोलने, क्षमतेपेक्षा जास्त माल वाहनात लादून त्याची वाहतूक न करणे, अवैध प्रवासी वाहतूक कशी धोक्याची आहे याविषयी यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना माहिती दिली. वाहतूक नियमांना फाटा दिल्याचे लक्षात आल्याने आजपर्यंत २७० वाहन चालकांचा वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. प्रत्येक दुचाकी चालकाने वाहनचालविताना सुरक्षीत प्रवासासाठी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन दत्तात्रय गुरव यांनी याप्रसंगी केले.
पथनाट्यातून जनजागृती
रस्ता सुरक्षा अभियांनाच्या निमित्ताने वाहन चालवितांना हेल्मेट न वापरल्यामुळे काय होऊ शकते, याबाबत पथनाट्यातून तरुण-तरुणींनी उपस्थितांमध्ये जनजागृती केली.