नाला खोलीकरणानंतर कचरा शेतातच
By admin | Published: June 5, 2015 02:08 AM2015-06-05T02:08:28+5:302015-06-05T02:08:28+5:30
कृषी विभागामार्फत दिग्रज येथे नाला खोलीकरण व सरळीकरणाचे काम करण्यात आले.
वर्धा : कृषी विभागामार्फत दिग्रज येथे नाला खोलीकरण व सरळीकरणाचे काम करण्यात आले. हे काम कंत्राटी पद्धतीने केले जाते. नाल्याचे काम पूर्ण झाल्यावर शेतातच उपटलेली झाडे, झुडपे असा कचरा टाकण्यात आला. यामुळे मालकीचे शेत असलेल्या शेतकऱ्यांना शेत मशागतीचे काम करण्यात ही बाब अडचणीची ठरत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधीत विभागाकडे तक्रार दिली. मात्र अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे.
याबाबत वृत्त असे की, सुभाष पाटील यांच्या मालकीचे दिग्रज भागात शेत सर्व्हे क्र. ३३ व ९ येथे लागून नाला आहे. या नाल्याचे खोलीकरण व रूंदीकरण एक महिन्यापूर्वी करण्यात आले. यानंतर नाल्यामधून काढलेला गाळ, धुऱ्यावरील झाडे असा कचरा शेतातच टाकण्यात आला. या नाल्याचा काठावरील शेतकऱ्यांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत कृषी विभाग, संबंधीत कंत्राटदाराकडे शेतकऱ्यांनी तक्रार देऊन कचरा उचलण्याची मागणी केली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना सोसावा लागतो नाहक भुर्दंड
नाल्यातील उपसलेला गाळ व धुऱ्यावरील झाडे नाल्याच्या कडेला असलेल्या शेतात टाकण्यात आला आहे. याची माहिती संबंधितांना देऊनही कचरा उचलण्यात आला नसल्याने याचा नाहक भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.
मातीचे बंधारा भरण व सरळीकरण करण्याची कामे उन्हाळ्यात केली जातात. मात्र यानंतर बंधाऱ्यामधील कचरा अन्यत्र वाहुन नेला जातो. मात्र दिग्रज येथे काम करताना संबंधितांना याचा विसर पडला का असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
शेती मशागतीच्या कामांना आता वेग आला असून नाल्यातील या कचऱ्यामुळे मशागतीच्या कामात अडसर येत आहे.