‘स्वच्छ’च्या कामात ट्रॅव्हल्सची आडकाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 11:35 PM2019-01-07T23:35:47+5:302019-01-07T23:36:12+5:30
स्थानिक सिव्हिल लाईन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोरील अनधिकृत ट्रॅव्हल्स स्टॅण्ड इतर वाहनचालकांच्या जीवितास धोकादायक ठरत असल्याने तत्काळ बसस्थानकाशेजारी असलेल्या महात्मा गांधी विद्यालयामागील भागात हलविण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु, जिल्हाधिकारी आमच्यावर मेहेरबान आहे, असे म्हणत सध्या डॉ. आंबेडकर उद्यानासमोर रस्त्याच्या मधोमधपर्यंत ट्रॅव्हल्स उभ्या केल्या जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक सिव्हिल लाईन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोरील अनधिकृत ट्रॅव्हल्स स्टॅण्ड इतर वाहनचालकांच्या जीवितास धोकादायक ठरत असल्याने तत्काळ बसस्थानकाशेजारी असलेल्या महात्मा गांधी विद्यालयामागील भागात हलविण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु, जिल्हाधिकारी आमच्यावर मेहेरबान आहे, असे म्हणत सध्या डॉ. आंबेडकर उद्यानासमोर रस्त्याच्या मधोमधपर्यंत ट्रॅव्हल्स उभ्या केल्या जात आहेत. या उद्यानाच्या भिंतीवर पालिकेद्वारे स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने आकर्षक चित्रे रेखाटण्यात आली आहेत. मात्र, याच बोलक्या भिंतीसमोर सध्या ट्रॅव्हल्स उभ्या केल्या जात असल्याने ‘स्वच्छ’च्या उद्देशालाच बगल दिली जात आहे.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी अतिक्रमण करून ट्रॅव्हल्स स्टॅण्डचे पक्के बांधकाम केले आहे. या ठिकाणी यवतमाळकडून नागपूर व नागपूरकडून यवतमाळच्या दिशेने जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स थांबतात. शिवाय लांब पल्ल्याच्या ट्रॅव्हल्सचा थांबा येथे आहे. परंतु, अनेक चालक इतर वाहनचालकांच्या जीवाची पर्वा न करता मनमर्जीने ट्रॅव्हल्स उभे करीत असल्याने हा प्रकार एखाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोरील ट्रॅव्हल्स स्टॅण्ड तातडीने गांधी विद्यालयाच्या मागील भागात हलविण्याच्या सूचना ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना देण्यात आल्या. सध्या जिल्हाधिकाºयांच्या सूचनांची अवहेलना ट्रॅव्हल्स व्यावसायिक करीत असल्याचे चित्र आहे. इतकेच नव्हे तर स्वच्छ व सुंदर वर्धा शहर या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून न.प. द्वारे साकारण्यात आलेली भित्तिचित्रे संपूर्ण झाकली जातील, अशा पद्धतीने ट्रॅव्हल्स सध्या उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे वाहतूक पोलीस, न.प. प्रशासन व जिल्हा प्रशासनाने योग्य कार्यवाही करण्याची गरज व्यक्त होत आहे.
वाहतूक पोलीस हतबल?
सदर अनधिकृत ट्रॅव्हल्स स्टॅन्डवर दररोज वाहतूक नियमांना बगल दिली जाते. इतकेच नव्हे, तर इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी केली जात आहेत. परंतु, हाकेच्या अंतरावर असलेल्या वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयातील वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी कुठलीही कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे.
स्वच्छ व सुंदर वर्धा या दृष्टीने ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी नगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या उपक्रमाला सहकार्य करावे.
- किशोर साखरकर, प्रशासकीय अधिकारी, न.प. वर्धा.
ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना त्यांची वाहने उभी करण्यासाठी महात्मा गांधी विद्यालयाच्या मागील जागा देण्यात आली आहे. त्यांनी ट्रॅव्हल्स तेथे उभे करणे गरजेचे आहे. तशा त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
- एस. बी. कोडापे, सहायक पोलीस निरीक्षक.
स्वच्छ व सुंदर शहर या उद्देशाने उद्यानाच्या भिंतीवर जनजागृतीपर भित्तिचित्रे न.प.द्वारे रेखाटण्यात आली आहे. परंतु, या अनधिकृत ट्रॅव्हल्स स्टॅण्डवर मनमर्जीने उभ्या केल्या जाणाºया ट्रॅव्हल्समुळे ती चित्रे सध्या झाकली जात आहेत. शिवाय तेथे मनमर्जीने ट्रॅव्हल्स उभ्या केल्या जात असल्याने इतर वाहनचालकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणी संबंधितांनी येत्या दहा दिवसांत योग्य कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- अतुल दिवे, जिल्हाप्रमुख, भीम टायगर सेना, वर्धा.