पोटाच्या खळगीसाठी राजस्थान ते वर्धा प्रवास
By admin | Published: January 21, 2016 02:03 AM2016-01-21T02:03:50+5:302016-01-21T02:03:50+5:30
संघर्ष जगण्याचा : दुकानांच्या गर्दीत कचेरी मार्गावरील उघड्यावरचा संसार दुर्लक्षित
वर्धा : स्वयंपाकघरासाठी लागत असलेल्या वस्तूंचे कुठल्याही स्त्री ला मोठेच कौतुक असते. त्यातच अशा अनेक गोष्टी शहरात फिरताना रस्त्यावर पाहायला मिळाल्यास त्यांना खरेदीचा मोह आवरत नाही. यामुळे सध्या शहरात राजस्थान येथून लोखंडी वस्तू विक्रीसाठी आणलेल्या नागरिकांची दुकाने ग्राहकांनी फुललेली दिसतात. उघड्यावरची दुकाने पाहताना त्यांचा उघड्यावरचा संसार मात्र अनेकांना लक्षात येत नाही.
सध्या शहरातील कचेरी मार्गावर राजस्थान येथून आलेल्या काही कुटुंबांची लोखंडी साहित्याची दुकाने सजली आहेत. विविध आकाराचे तवे, विविध मापाच्या कढया, पावशी, सत्तूर, सांडशी, पायल्या, खलबत्ते, पायली, चाळण्या, झारे, घमेले यासह कुऱ्हाड व इतरही साहित्य विक्रीस आहेत. मोठ्या प्रमाणात व तुलनेत स्वस्त सदर साहित्य खरेदीसाठी खास महिलावर्गाची लगबग पाहावयास मिळते. हे साहित्य घेऊन अनेकांच्या घरी चमचमीत पदार्थ तयार होणार असले तरी ते विक्री करीत असलेल्यांना येथेच रस्त्याच्या कडेला चूल मांडून भाकरीचा तुकडा तोडावा लागत आहे. यातून किती पैसे घरी न्याल, असे एखाद्याला विचारले असता ‘खा-पी के सब बराबर हो जाता है साहब’, असेच उत्तर मिळते. संपूर्ण कुटुंब दिवसभर साहित्याची विकी करते. याच वेळी त्यांची कच्ची-बच्ची रस्त्यावर आपल्याच धुंदीत खेळत असतात. कधी एखादे वाहन त्यांच्या अंगावरून जाईल याची भ्रांतही त्यांना नसते. दिवस ओसरल्यावर एकीकडे चुलीवर अन्न शिजत असताना परिवाराचा मुखिया मिळालेल्या पैशाची आकडेमोड करीत असतो. कडाक्याच्या थंडीत उघडावरच नव्या दिवसाची वाट पाहत हे निद्राधीन होतात. साहित्य खरेदीसाठी आल्यावर नको असलेल्या वस्तूंकडे जसे दुर्लक्ष व्हावे, तसाच त्यांचा संसारही नागरिकांच्या नजरेतून दुर्लक्षितच राहतो.(शहर प्रतिनिधी)