रुग्णांना सौजन्याची वागणूक द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 11:24 PM2018-04-02T23:24:19+5:302018-04-02T23:24:19+5:30
सर्वांना आरोग्याची सुविधा मिळावी यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचाराकरिता येतात. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे नातेवाईक असतात; परंतु त्यांची हेळसांळ केल्या जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सर्वांना आरोग्याची सुविधा मिळावी यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचाराकरिता येतात. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे नातेवाईक असतात; परंतु त्यांची हेळसांळ केल्या जाते. त्यांना योग्य वागणुकही दिल्या जात नाही. अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापुढे रुग्ण व नातेवाईकांना सौजन्याची वागणूक देऊन त्यांच्यावर तातडीने उपचार करावे असे निर्देश आ. डॉ. पंकज भोयर यांनी सोमवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांना दिले.
आ. डॉ. पंकज भोयर यांच्या जनसंपर्क कार्यालयात या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा सामान्य रुग्णालयात येणाऱ्या अडचणी व समस्यांबाबत आॅटो चालकांनी आ. भोयर यांची भेट घेऊन त्यांना याबाबत अवगत केले होते. तथापि आमदारांनी या बाबींची दखल घेवून शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले. बैठकीत आॅटो चालकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील समस्यांचा पाढा वाचला. यावेळी आॅटो चालकांनी सांगितले की, आम्ही दररोज शहर व ग्रामीण भागातून येणाºया रुग्णाना जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचवितो. अनेकदा अत्यवस्थ स्थितीतही रुग्णांना दवाखान्यात आणले जाते; परंतु रुग्णालयात त्यांच्यावर तातडीने उपचार न करता उर्मटपणाची वागणूक दिल्या जाते. अनेकदा रुग्ण गंभीर असताना देखील त्याकडे दुर्लक्ष केल्या जाते. त्यामुळे ही बा त्या रुग्णाच्या जीवावरही बेतते. परिवारातील सदस्यांना कधी रुग्णालयात नेले तर या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे आॅटो चालकांनी बैठकीत सांगितले. विविध समस्यांचा पाढा वाचला.
आॅटोचालकांनी वाचला असुविधांचा पाढा
रुग्णालयात स्वच्छतेचा अभाव असून अनेक ठिकाणी अस्वच्छता असते. अनेकदा डॉक्टर रुग्णालयात आपल्या ठराविक वेळेत न येणे, रुग्णावर थातुरमातूर उपचार आदि बाबी सांगितल्या. आॅटो चालकांनी रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन, इसीजी साठी नियुक्त असलेल्या एकच तंत्रज्ञ, रक्तदाब मोजतांना होणारी टोलवाटोलव व अन्य असुविधांबाबत बैठकीत माहिती दिली. यावर आ. डॉ. पंकज भोयर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मडावी यांना विचारणा केली. तसेच रुग्णांना तातडीने वैद्यकीय सेवा पुरवाव्या असे निर्देश देत इसीजी विभागासाठी आणखी एका महिला तंत्रज्ञानाची नियुक्ती करावी असे निर्देश दिले. शासन स्तरावर काही प्रश्न असल्यास ते कळवावे असेही डॉ. मडावी यांना सांगितले.