योग्य आळ्यांमुळे कमी पाण्यात वृक्ष संवर्धन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:03 AM2018-02-28T00:03:15+5:302018-02-28T00:03:15+5:30
हनुमान टेकडीवर मागील दोन वर्षांपासून वृक्षारोपण व संवर्धन मोहीम वैद्यकीय जनजागृती मंचद्वारे राबविली जात आहे.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : हनुमान टेकडीवर मागील दोन वर्षांपासून वृक्षारोपण व संवर्धन मोहीम वैद्यकीय जनजागृती मंचद्वारे राबविली जात आहे. राज्य शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाद्वारे आयोजित वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत हनुमान टेकडीवर नऊ हजार रोपटी लावण्यात आली आहे. आता उन्हाळा सुरू झाला आहे. या दिवसांत रोपट्यांचे संवर्धन महत्त्वाचे ठरणार आहे. या संवर्धनाकरिता वैद्यकीय जनजागृती मंचद्वारे तांत्रिकदृष्ट्या योग्य आळे केले आहे. या आळ्यांमुळे कमी पाण्यातही झाडे जगू शकत असल्याचे सांगण्यात आले आहे.
विविध सामाजिक संघटना, वाढदिवस आणि अनेकांच्या स्मृती -प्रीत्यर्थ हनुमान टेकडीवर येत वृक्षारोपण केले. सर्वांनी लावलेल्या रोपट्यांचे वृक्षात परिवर्तन करण्याचा वसा वैद्यकीय जनजागृती मंचने घेतला आहे. झाडांच्या संरक्षणाकरिता त्यांना आधार देण्यासह आसपास वाढलेले गवत कापण्याचे कामही त्यांच्यावतीने टेकडी परिसरात झाले. या टेकडीवरील वृक्षारोपणाची दखल घेत येथे पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अनेक अधिकाºयांनी भेट दिली. वृक्षसंवर्धन कार्याला जिल्हाधिकाºयांनी अनेकदा सहकार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनात येथे झाडांकरिता पाण्याची सुविधा करण्यात आली असून यातून सध्या वृक्षसंवर्धनाचे काम सुरू आहे.
टेकडीवर लावलेल्या वृक्षांपैकी सुमारे ९५ टक्के वृक्षांचे संवर्धन झाले आहे. वृक्षांना नियमित पाणी दिले जाते. प्रत्येक वृक्षांभोवती तांत्रिक दृष्ट्या योग्य आळे तयार केले आहे. यामुळे कमी पाण्यातही वृक्षाला आवश्यक पाणी टिकवून ठेवण्यास साह्य होते, अशी माहिती व्हीजेएमचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी दिली. या वृक्षांच्या संगोपन कार्यात सहकार्य करावे आणि आळे तयार करण्याचे तंत्रदेखील जाणून घ्यावे. त्यामुळे अन्य ठिकाणीदेखील वृक्ष संवर्धनास उपयोग होईल, असे आवाहनही वर्धेकरांना व्हीजेएमद्वारे करण्यात आले आहे.