एक झाड कोसळताच सतरा झाडांवर कुऱ्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 09:33 PM2019-04-27T21:33:42+5:302019-04-27T21:34:41+5:30
येथील रेल्वे स्थानकावरील एक झाड उन्मळून पडल्याने इतरही झाड पडू शकते असा अजब तर्क लावित स्टेशन अधीक्षकांनी तब्बल सतरा झाडांवर कुºहाड चालविली.त्यामुळे पर्यावरण संवर्धन संस्थेसह पर्यावरण प्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : येथील रेल्वे स्थानकावरील एक झाड उन्मळून पडल्याने इतरही झाड पडू शकते असा अजब तर्क लावित स्टेशन अधीक्षकांनी तब्बल सतरा झाडांवर कुºहाड चालविली.त्यामुळे पर्यावरण संवर्धन संस्थेसह पर्यावरण प्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रेल्वे स्थानकावरील फलाटाच्या बाजुला कडुनिंब, करंज, अशोकासह मोठी झाडे आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता रेल्वे स्थानकालगतच्या महेश ज्ञानपीठ विद्यालयातून पवन फड नामक विद्यार्थ्याने बघितले असता त्याला स्थानकावरील काही भाग अचानक भकास झालेला दिसून आला. त्यामुळे त्याने बाईकाने लक्ष दिल्यावर या परिसरातील झाडांची कत्तल केल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने लगेच पर्यावरण संवर्धन संस्थेचे आशिष भोयर यांना माहिती दिली. माहिती मिळताच सहाकाऱ्यांसोबत त्यांनी रेल्वे स्थानकावरील फलाट गाठला.
तेव्हा फलाटालगतची एक-दोन नाही तर तब्बल सतरा झाडे तोडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे भायेर यांनी स्टेशन अधीक्षक एच.व्ही.वर्मा यांना भ्रमणध्वनीवरुन वृक्षतोडीबाबत माहिती जाणून घेतली. तेव्हा त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे सर्वच थक्क झाले. ‘या परिसरातील पिंपळाचे मोठे झाड अचानक उन्मळून पडल्याने इतरही झाडं अशीच पडून जातील म्हणून सर्वच झाडे मुळासकट तोडून टाकण्याचा निर्णय आम्ही घेतला’ असे वर्मा यांनी सांगितले.
यावेळी आशिष भोयर यांनी वर्मा यांना या झाडांबाबत माहिती दिल्यानंतर अधीक्षक वर्मा यांना चूक कळली. त्यामुळे ज्या झाडांवर कुºहाड पडणार होती. ती झाडं तोडणार नसल्याचे आश्वासन दिले. सोबतच या प्रकरणाची चौकशी करुन पर्यावरणाची नुकसान भरपाई म्हणून चारपट झाडं लावण्यात यावी, या मागणीचे निवेदनही पर्यावरण संवर्धन संस्थेच्यावतीने रेल्वे प्रशासनाला दिले.
हिंगणघाटचे पर्यावरणवादी जागरुक
रेल्वेस्थानकावरील वृक्ष तोडण्यात आल्याची माहिती मिळताच पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी तेथे धाव घेऊन या प्रकरणाची माहिती घेतली. यापूर्वीही शहरात एका डॉक्टरने गाडी ठेवता येत नाही म्हणून वृक्षतोड केली होती. याबाबतही शहरातील पर्यावरणवाद्यांनी पुढाकार घेत त्या जागी वृक्ष लावून घेतले होते. तसेच राष्ट्रीय, राज्य महामार्गाच्या कामात करण्यात आलेल्या वृक्षतोडीच्या विरोधातही येथे पर्यावरणवादी व वृक्षप्रेमींनी जाहीर नाराजी व्यक्त करून शासनाला तसे निवेदनही सादर केले होते. ही जागरूकता फक्त हिंगणघाटमध्ये दिसून येते.