सेवाग्रामातील वृक्षतोड, देशभरातील गांधीजन एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 02:46 PM2020-09-02T14:46:22+5:302020-09-02T14:49:08+5:30
सेवाग्राम-वर्धा मार्गावरील वृक्षतोडीबाबत चिंता आणि दु:ख व्यक्त करीत ही वृक्षतोड थांबविण्याच्या मागणीसाठी देशभरातील गांधीजन एकवटले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सेवाग्राम-वर्धा मार्गावरील वृक्षतोडीबाबत चिंता आणि दु:ख व्यक्त करीत ही वृक्षतोड थांबविण्याच्या मागणीसाठी देशभरातील गांधीजन एकवटले आहे. या मार्गाचे ऐतिहासिक महत्त्व आणि वैचारिक वारसा लक्षात घेऊन या मार्गाला ‘शांतीपथ’ म्हणून विकसित करावे, अशी मागणी गांधी स्मारक निधीव्दारे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
गांधी स्मारक निधी, दिल्ली या अग्रणी संस्थेद्वारे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांना पाठविलेल्या निवेदनात देशातील गांधी विचारकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. १९४० च्या दशकात गांधीजींच्या नेतृत्वात ज्येष्ठ सहकारी प्रभाकर जोसेफ, आर्यनायकम, आण्णासाहेब सहस्रबुद्धे यांनी ग्रामवासीयांना सोबत घेऊन वर्धा सेवाग्राम मार्गावर असंख्य झाडे लावली आणि जगवली. यात प्रामुख्याने कडुलिंबाचीही झाडे होती. गांधीजींच्या पर्यावरणप्रेमाची जगाला साक्ष देणाऱ्या या आश्रमाकडे जाणारा हा रस्ता साधेपणा जोपासणारा, अल्प खर्चाचा आणि पर्यावरणाचे संरक्षण करणारा असावा, अशी विनंती या निवेदनातून केली आहे.
वृक्ष बचाओ नागरिक समितीच्या अभियंता चमूने नवनिर्माणाधीन रस्त्याचा सखोल अभ्यास करून सुधारणा सुचविणारा एक अहवाल सादर केला आहे. या अहवालाचा संदर्भ देत रस्त्याची रुंदी १० मीटर ठेऊन या मार्गावरील कापल्या जाणाऱ्या ६९ वृक्षांसह रस्त्यालगतची तब्बल २३५ झाडे वाचविण्याचा पर्याय या निवेदनातून गांधीजनांनी दिला आहे. केवळ सेवाग्राम व वर्ध्यातीलच नव्हे तर देशभरातील वृक्षतोड थांबवून गांधींच्या तात्विक आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचा स्वीकार करावा, अशी हाक देशातील ज्येष्ठ गांधीविचारकांनी दिली आहे.
या गांधी विचारकांचा पुढाकार
गांधी स्मारक निधीचे केंद्रीय अध्यक्ष रामचंद्र राही, राधा भट्ट (दिल्ली), के.एम.नटराजन (तामिळनाडू), संतोष गोइदी, गुजरात विद्यापीठातील विचारक दिना पटेल (अहमदाबाद), कुमार शुभमूर्ती (बिहार), धिरुभाई मेहता (मुंबई), सर्वोदय मंडळाच्या आशा बोथरा (राजस्थान), पर्यावरणतज्ज्ञ जया मित्रा (पश्चिम बंगाल), राष्ट्रीय गांधी संग्रहालयाचे ए. अन्नामलाई, राष्ट्रीय युवा संघटनचे कुमार प्रशांत, विश्वजीत रॉय (दिल्ली), के. जी. जगदीशन (केरळ), सोपान जोशी, शोभा सुपेकर (पुणे), सोशल रिसर्च इन्स्टिट्यूटचे डी.एम. दिवाकर, प्रा. ए. एन. सिन्हा (पाटणा), नयन भंडारी शर्मा (आसाम), सर्व सेवा संघाचे अमरनाथ भाई (वाराणशी), डॉ. वर्षा दास, जी. बी. शिवराजू (बंगलोर) यांच्यावतीने गांधी स्मारक निधीचे केंद्रीय सचिव संजय सिन्हा यांनी वृक्षतोड थांबविण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहेत.