सेलिब्रेटीपेक्षाही झाडे महत्त्वाची; नागराज मंजुळे, किशोर कदम अन् सयाजी शिंदे यांनी रसिकांशी साधला मुक्त संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2023 10:36 PM2023-02-04T22:36:35+5:302023-02-04T22:37:19+5:30
Wardha News प्राणवायू देणाऱ्यांसारखीच जगवणारी माणसेही महत्त्वाची असल्याचे उद्बोधन दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेते किशोर कदम- सौमित्र आणि अभिनेता सयाजी शिंदे यांनी ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावरून केले.
नरेश डोंगरे/ महेश सायखेडे
राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी, वर्धा : सेलिब्रेटी हे अन्न, सावली देत नाहीत. मात्र, झाड देते. वाचाल तर वाचाल, असे थोर पुरुषांनी सांगितले असून, अनेक साहित्यिक त्याला पुन्हा पुन्हा उजाळा देतात. ते खरेही आहे. वाचलेली माणसे वाचली म्हणूनच झाडे लागली. प्राणवायू देणाऱ्यांसारखीच जगवणारी माणसेही महत्त्वाची असल्याचे उद्बोधन दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेते किशोर कदम- सौमित्र आणि अभिनेता सयाजी शिंदे यांनी ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावरून केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवारी सायंकाळी अभिनेते सयाजी शिंदे, दिग्दर्शक नागराज मंजुळे तसेच अभिनेता किशोर कदम-सौमित्र यांनी रसिकांशी मुक्त संवाद साधला. व्यासपीठावर कार्यवाह प्रदीप दाते, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, बालाजी सुतार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
मुक्त संवाद साधताना सयाजी शिंदे यांनी सेलिब्रिटींपेक्षाही झाडे महत्त्वाची असल्याचे सांगत प्रत्येक व्यक्तीने त्याच्या वयाइतकी झाडे लावून त्यांचे संगोपन केले पाहिजे, असे आवाहन केले. झाडे प्राणवायू, सावली, फळे देतात. पण सेलिब्रेटी काय देतात? असा थेट सवालही सयाजी शिंदे यांनी केला. साहित्य संमेलन होतात; परंतु, वृक्ष संमेलन कधी होणार? असा सवाल सयाजी शिंदे यांनी केला. त्यावर सौमित्र यांनी वाचलेली माणसे वाचली म्हणून झाडे वाचली, असे सांगत वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले, तर नागराज मंजुळे यांनी लय भरभरून श्वास घेत. झाडे राहतील व माणसेच राहिली नाही, तर झाडे जगवणार कोण, असा सवाल केला. झाडांवरून सुरू झालेले मतभेद अखेर झाडांसाठी माणसं आणि माणसांसाठी झाडं जगणं आवश्यक आहे, यावर एकमत होऊन मिटले.
यशाचे निश्चित असे काही सूत्र वा गणित नसते : मंजुळे
यशाचे निश्चित असे काही सूत्र वा गणित नसते. अपयशामुळे न खचता प्रत्येकाने आपण काम करीत राहिले पाहिजे. वाटा किती दूर जाऊ शकतात आणि वाटातून निघालेल्या वाटा किती दूर जाऊ शकतात, हे माहिती नसते. म्हणून कलाकाराने काम करीत राहिले पाहिजे, असे नागराज मंजुळे यांनी सांगितले.
डिग्री घेणे अन् अक्कल येणे यात खूप फरक : शिंदे
डिग्री घेणे आणि अक्कल येणे यात खूप फरक असतो. अभिनयाचे प्रशिक्षण घेणारे सर्वचजण अभिनेते होत नाहीत. त्यामुळे इच्छाशक्ती, वेड आणि आवडीने काम करीत राहिले पाहिजे. यशस्वी होण्याचा कोणताही फाॅर्म्युला नाही. आई-वडिलांएवढे चांगले जगात विद्यापीठ नाही, असे सयाजी शिंदे यांनी स्पष्ट केले.
हातात पुस्तक आले अन् आत्महत्येचा विचार बदलला : कदम-सौमित्र
ठरवून कुणाच्या आयुष्यात काही होत नाही. केवळ अंबानीसारख्यांच्या आयुष्यात होते. अजूनही मला कवी, नट आहे, असे वाटत नाही. माझे शिक्षण जास्त नाही. एकवेळा आत्महत्येचा विचार मनात आला होता. पण पुस्तक हाती घेत वाचन केल्यावर आत्महत्येचा विचार डोक्यातून निघून गेला, असे सांगून किशोर कदम- सौमित्र यांनी वाचनाचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले.