झाडे लावली; पण संरक्षक कठडे बेपत्ताच
By admin | Published: July 5, 2017 12:24 AM2017-07-05T00:24:17+5:302017-07-05T00:24:17+5:30
स्थानिक बसस्थानक परिसरात महामार्गालगतच्या दोन्ही सर्व्हीस रोडवर लहान-मोठ्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केले होते.
अतिक्रमण हटल्याने दिलासा : तारांचे कुंपण न केल्याने पुन्हा लागणार दुकाने
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : स्थानिक बसस्थानक परिसरात महामार्गालगतच्या दोन्ही सर्व्हीस रोडवर लहान-मोठ्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केले होते. यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. ओरिएंटल पाथवे कंपनीने मागणी लक्षात घेत अतिक्रमण हटविले, तेथे वृक्षारोपण केले; पण संरक्षक कठडे तथा तारांचे कुंपण केले नाही. यामुळे अतिक्रमण जैसे थे होण्याची भीती व्यक्त होत आहे.
सर्व्हीस रोडवर अतिक्रमण झाल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. ग्रामस्थांच्या मागणीवरून तथा नगर पंचायतच्या पुढाकाराने १५ दिवसांपूर्वी अतिक्रमण हटविण्यात आले. रस्त्यालगत फुल झाडे व शोभेची झाडे लावण्यात आली; पण झाडांच्या सुरक्षिततेसाइी तारांचे कुंपण वा संरक्षक कठड्यांची व्यवस्था केली नाही. यामुळे झाडांचे भवितव्य धोक्यात आले आहे. हजारो रुपये खर्चून लावलेली झाडे मोकाट जनावरे फस्त करीत असल्याचे दिसून येते.
अतिक्रमण हटविलेल्या जागेवरही तारांचे कुंपण करण्यात आले नाही. यामुळे पुन्हा अतिक्रमण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पूर्वीप्रमाणेच अतिक्रमण झाल्यास शहरातील वाहतूक धोक्यात येऊन अपघाताला निमंत्रण ठरणार आहे. यापूर्वीचे अतिक्रमण ओरीएंटल पाथवे कंपनीच्या दुर्लक्षामुळे झाले होते, असा आरोप होत आहे. आता पुन्हा दुर्लक्ष केल्यास अतिक्रमण हमखास होणार, हे निश्चित आहे. यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
ओरिएंटल कंपनीकडून नागरिकांच्या अपेक्षा
सर्व्हीस रोडवर वारंवार अतिक्रमण होऊ नये म्हणून ओरीएंटल पाथवे कंपनीने प्रत्येक १५ दिवसांनी भेट द्यावी. अतिक्रमण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. मोकाट गुरे पकडून कारवाई करावी. त्वरीत तारांचे कुंपण करावे, अशी मागणी नागरिक करीत आहे. महामार्गावर अतिक्रमण होऊ न देण्याची व देखभाल करण्याची जबाबदारी ओरिएंटल पाथवे कंपनीची आहे. यामुळे ही जबाबदारी निरपेक्षपणे पार पाडावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतात.