कांचनगंगा बेस शिखरावर तिरंगा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 02:53 AM2019-11-17T02:53:39+5:302019-11-17T02:53:52+5:30
१६ हजार ५०० फूट उंची; कॅप्टन मोहन गुजरकर यांच्यासह ७ हिमगिरी ट्रेकर्सची कामगिरी
वर्धा : स्थानिक २१ महाराष्ट्र बटालियनचे एन.सी.सी. अधिकारी तथा प्रहार समाज जागृती संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर यांच्यासह महाराष्ट्र राज्यातील ७ पर्वतारोहकांनी भारताचे सर्वोच्च शिखर तथा जगातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर माऊंट ‘कांचनगंगा’ च्या बेस कॅम्पपर्यंत १६ हजार ५०० फूट उंच चढाई उणे २० अंश सेल्सिअस तापमानात यशस्वीपणे पूर्ण करून ७ नोव्हेंबर रोजी भारताचा तिरंगा फडकावला.
चढाईसाठी अत्यंत कठीण ‘कांचनगंगा’ बेस कॅम्प पर्वतारोहण अभियानाचे’ आयोजन मुंबईच्या हिमगिरी ट्रेकर्स फाऊंडेशनचे संतोष तेलंगे यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. २ नोव्हेंबर रोजी पश्चिम सिक्कीमच्या युकसम या ७५०० फूट उंच या ठिकाणावरून चढाईची सुरुवात करून करण्यात आली. सोका ९ हजार फूट उंच, फेडंग १२०० फूट, झोंगरी १२ हजार ५५० फूट, कोचरूंग १३ हजार ५० फूट, लामून १४ हजार फूट येथे रात्रीचा विसावा घेऊन ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता १६ हजार ५०० फूट उंच असलेल्या ‘कांचनगंगा’ बेस कॅम्पपर्यंत यशस्वी चढाई करून तिरंगा फडकावला. परतीची चढाई लामून ते युकसम हे अंतर चार दिवसांत पूर्ण करून १० नोव्हेंबर रोजी अभियान यशस्वी झाले.
‘कांचनगंगा’ सर करणारे शिखरवीर
माऊंट ‘कांचनगंगा’ शिखर नेपाळ-चिन-तिबेट-भारत सीमेलगत असून हा भाग चढाईकरिता खडतर, निरंतर वाहणारा प्रचंड हिमवारा व असुविधाजनक असल्यामुळे फार कमी गिर्यारोहक उत्साह दाखवितात. कांचनगंगा बेस मोहिमेत संतोष तेलंगे यांच्यासमवेत कॅप्टन मोहन गुजरकर, अभियंता सुनीत पिंपळे, डॉ. अनंत कामत, सहायक पोलीस निरीक्षक जावेद शेख, सुहास म्हात्रे, विजय पाटील व हेमा सुब्रमण्यम यांचा समावेश होता.