आदिवासी आश्रमशाळा झुडपांच्या विळख्यात

By admin | Published: July 20, 2016 01:36 AM2016-07-20T01:36:15+5:302016-07-20T01:36:15+5:30

आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा याकरिता शासनाच्यावतीने आदिवासीबहुल भागात आदिवासी आश्रमशाळा

Tribal Ashramshala known among the shrubs | आदिवासी आश्रमशाळा झुडपांच्या विळख्यात

आदिवासी आश्रमशाळा झुडपांच्या विळख्यात

Next

शाळांची सुरक्षा वाऱ्यावर : विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात; सुरक्षा भिंतीच्या नावावर तारांचे कुंपण
वर्धा : आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा याकरिता शासनाच्यावतीने आदिवासीबहुल भागात आदिवासी आश्रमशाळा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या आदिवासी आश्रमशाळांवर शासनाचा कोट्यवधी रुपये खर्च होत असला तरी येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे जीवन सुरक्षित नसल्याचे यवतमाळ येथील सर्पदंशाने झालेल्या विद्यार्थ्याच्या मृत्यूने उघड केले आहे. यामुळे वर्धा जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी कितपत सुरक्षित आहेत, हे जाणून घेण्याकरिता लोकमत चमूने मंगळवारी ‘स्टींग आॅपरेशन’ केले असता वर्धेतही विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचेच दिसून आले आहे.
साधारणत: आदिवासी आश्रमशाळा जंगलव्याप्त भागात असल्याचेच दिसून आले आहे. याच शाळांत विद्यार्थ्यांच्या अध्ययनाची व त्यांच्या निवासाची सोय करण्यात येते. शासनाच्या नियमानुसार शाळा सर्व दृष्टीने सुरक्षित असणे अनिवार्य आहे; मात्र वर्धा जिल्ह्यातील आश्रमशाळांना झुडपांचा विळखा असल्याचे दिसून आले आहे. शिवाय शाळांच्या सुरक्षा भिंती नाममात्र असल्याचेच दिसून आले. या सुरक्षा भिंतीतून सरपटणारे प्राणी सहज शाळेत शिरून त्यापासून विद्यार्थ्यांना धोका उद्भवण्याची शक्यता अधिक आहे. आष्टी तालुक्यातील पांढुर्णा व कारंजा तालुक्यातील नारा येथील आश्रमशाळेला सुरक्षा भिंत नसल्याचे दिसून आले. सेलू तालुक्यातील जुनगड या गावात दोन निवासी शाळा आहेत. यात एक आदिवासी आश्रमशाळा असून तिचे नाव लक्ष्मणराव मानकर गुरूजी आदिवासी शाळा असे आहे. या शाळेत सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना आहे; पण याच शाळेतील शिक्षकांना मेळघाट येथून विद्यार्थी पळवून आणताना रंगेहात पकडण्यात आले होते. तेव्हापासून ही शाळा अधिकच चर्चेत आहे. आर्वी तालुक्यातील निंबोली शेंडे या पुनर्वसीत गावात असलेल्या शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे धिंडवडे निघत असल्याचे दिसून आले आहे. या गावातून वर्धा नदी गेल्याने या शाळेत कधीही साप, विंचू आदी सरपटणारे पाणी शिरण्याचा धोका आहे. यातून विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. ‘लोकमत’च्यावतीने करण्यात आलेल्या या स्टिंग आॅपरेशनने जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

पांढुर्णा आदिवासी आश्रमशाळेची सुरक्षा वाऱ्यावर
४आष्टी तालुक्यातील पांढुर्णा येथील आश्रमशाळेत १३९ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांकरिता मोठी इमारत आहे; मात्र त्याला सुरक्षा भिंत नाही. शाळेच्या सभोवताल वाढलेल्या झुडपांमुळे शाळेत सरपटणारे प्राणी येथे शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळेच्या सुरक्षेच्या नावावर तार लावण्यात आले आहेत. मुख्य प्रवेशद्वार नाही, तर आवारात गवत वाढले असून विद्यार्थ्यांना धोका होण्याची शक्यता आहे. शाळेत चौकीदार व स्वच्छता कर्मचारी नाही.

नारा येथील आश्रमशाळेतील सुरक्षा भिंत तुटलेली
४कारंजा (घाडगे) तालुक्यात नारा येथे स्व. यादवराव केचे आदिवासी आश्रमशाळा आहे. येथे ३३१ विद्यार्थी पटावर आहेत. या शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा बोजवारा आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याकरिता शुद्ध पाणी नाही. स्वयंपाक गृह उघड्यावर आहे. सुरक्षा भिंत पडली आहे. त्यामुळे केवळ सरपटणारे प्राणीच नव्हे तर मोठी जनावरे कधीही आत शिरू शकतात. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरिता शाळेत विशेष कुठल्याही उपाययोजना नसल्याचे येथे दिसून आले.

आदिवासी मुलींच्या वसतिगृहात कृषी साहित्य
४हिंगणघाट येथील माता मंदिर वॉर्डात आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहाची इमारत नव्यानेच बांधण्यात आली असून वसतिगृहाच्या परिसरात पडून असलेले कृषी सिंचन पाईप पावसाळ्याच्या दिवसांत गैरसोयीचे ठरत असल्याचे दिसून आले आहे. याची आदिवासी विकास मंडळाने दखल घेण्याची गरज आहे.
४आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह भाड्याच्या इमारतीत असून ते विद्यार्थ्यांसाठी धोक्याचे ठरत असून याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

वायगाव (निपाणी) येथील आश्रमशाळा
४वर्धेलगत असलेल्या वायगाव (निपाणी) येथील ठाकरे अनुदानित आश्रमशाळेला सुरक्षा भिंत नाही. विद्यार्थी संख्या वाढत असल्याने येथे नवीन इमारत बांधण्यात येत असून त्यावेळीच येथे संरक्षक भिंत बाधण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या शाळेत २५२ विद्यार्थी आहेत. आजूबाजूला जंगलव्याप्त भाग असल्याने येथे सरपटणाऱ्या प्राण्यांचा अधिक वावर असून विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे.
४सरपटणारे प्राणी इमारतीत शिरू नये म्हणून इमारतीच्या सभोवताल थिमेट टाकण्यात येत असून त्याच्या वासाने साप आदी प्राणी इमारतीच्या आत येत नसल्याचे आश्रमशाळेच्यावतीने सांगण्यात आले आहे. शिवाय वाढलेल्या गवतावर तणनाशकाची फवारणी केल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

सेलू तालुक्यातील जुनगड येथे दोन आश्रमशाळा
४सेलू तालुक्यातील जुगनड येथे दोन आश्रमशाळा आहेत. यात गाडगे महाराज विमुक्त भटक्या जमाती नावाने असलेल्या शाळेच्या इमारतीलाच लागून शेती आहे. या शाळेला सुरक्षा भिंत व प्रवेशद्वार असली तरी लगत शेती असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता अधिक आहे. या शाळेत १२० विद्यार्थी आहेत. तर स्व. लक्ष्मणराव मानकर गुरूजी आश्रमशाळेत सुरक्षेच्या दृष्टीने सर्वच उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे दिसून आले. असे असले तरी या शाळेच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना जमिनीवर झोपावे लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत हे धोक्याचे ठरू शकते. या शाळेत एकूण ६०२ विद्यार्थी पटावर आहेत.

निंबोली (शेंडे) शाळेतील सुरक्षा भिंत अपुरी
४ आर्वी तालुक्यातील पुनर्वसन गाव निंबोली (शेंडे) येथे असलेल्या आदिवासी आश्रमशाळेला पुरेशी सुरक्षा भिंत नसल्याचे दिसून आले. गावात वर्धा नदी असल्याने पावसाच्या दिवसांत रात्रीला साप निघण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांकरिता स्वतंत्र प्रसाधनगृह नाही. ही आदिवासी आश्रमशाळा अजूनही भाड्याच्या खोलीत असून सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना अत्यल्प असल्याचे दिसून आले.
४हिवरा (तांडा) येथील शाहू महाराज आश्रमशाळेला स्वत:ची इमारत आहे; मात्र ती गावाच्या बाहेर जंगलव्याप्त भागात असल्याने येथे विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आहे. शाळेला संरक्षक भिंत असली तरी त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचे दिसून आले.

Web Title: Tribal Ashramshala known among the shrubs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.