अन् वानरविहिरात अचानक पोहचले आदिवासी मंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 05:00 AM2020-07-09T05:00:00+5:302020-07-09T05:00:08+5:30
वीज ग्राहकांच्या तक्रारी बाबत बैठक घेऊन त्यांच्या समस्या सोडवल्या. जिल्हा परिषद सभागृहामध्ये आदिवासी विकासासंदर्भात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना आदिवासींच्या खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्याचे निर्देश दिलेत. दौरा आटोपून नागपूरला परत जात असताना ना. तनपुरे यांनी सेलू तालुक्यातील वानरविहीरा या ३१५ लोकसंख्या असलेल्या आदिवासी बहुल गावाला भेट दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणी : वानरविहरा बोर अभयारण्याला लागून असलेले जिल्ह्याच्या सीमेवरील शेवटचे आदिवासी गाव. वर्धा जिल्ह्याचा दौरा आटोपून नागपूरला परत जाताना या गावात आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे अचानक पोहचलेत. ७ जुलैला ऊर्जा, नगरविकास व आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी वीज ग्राहकांच्या तक्रारी बाबत बैठक घेऊन त्यांच्या समस्या सोडवल्या. जिल्हा परिषद सभागृहामध्ये आदिवासी विकासासंदर्भात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना आदिवासींच्या खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्याचे निर्देश दिलेत. दौरा आटोपून नागपूरला परत जात असताना ना. तनपुरे यांनी सेलू तालुक्यातील वानरविहीरा या ३१५ लोकसंख्या असलेल्या आदिवासी बहुल गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी गावातील पुरुष, महिला, युवक, शालेय विद्यार्थी यांच्याशी समाजभवनात मनमोकळ्या गप्पा मारल्या व लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. जंगलाला लागून शेती असल्यामुळे वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. यासाठी तारेचे कुंपण योजनेमधून उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. तसेच शेतीकडे जाणारा रस्ता हा जंगलातून जातो. त्यामुळे हा रस्ता मंजूर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
गावामध्ये वाचनालय, व्यायाम शाळा आणि स्मशानभूमीसाठी रस्ता या बाबींची पण गावकऱ्यांनी मागणी केली. याबाबत जागा उपलब्ध करून दिल्यास व्यायामशाळा आणि वाचनालय देण्याचा निश्चित प्रयत्न करू अशी हमी ना. तनपुरे यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर शेतीच्या रस्त्यासाठी सामूहिक वनहक्कच्या दाव्याचा प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीसमोर सादर करावा, त्या समिती मार्फत हे प्रकरण मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी उपायुक्तांना दिलेत. समाजभवनचा काय उपयोग करता? असा प्रश्न तनपुरे यांनी विचारल्यावर गावातील लोकांनी गावातील प्रत्येक घरातील छोट्या-मोठ्या कार्यक्रमासाठी हे समाजभवन उपयोगी पडते. गावातील कार्यक्रम, बचत गटाची मिटींग, बचत गटाचे कार्यक्रम तसेच ग्रामपंचायतची सभा सुद्धा या समाजभवना घेत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. यावेळी आदिवासी विकास विभागाचे नागपूर उपायुक्त दीपक हेडाऊ, प्रकल्प अधिकारी दिगंबर चव्हाण उपस्थित होते.