आदिवासी समाजबांधव रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 11:33 PM2018-04-03T23:33:38+5:302018-04-03T23:33:38+5:30

पोलिसांनी आत्महत्या दर्शविलेल्या शुभांगी पिलाजी उईकेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप अनेक आदिवासी संघटनांनी केला आहे.

Tribal society on the road | आदिवासी समाजबांधव रस्त्यावर

आदिवासी समाजबांधव रस्त्यावर

Next
ठळक मुद्देशुभांगी उईके हत्या प्रकरण : पोलीस तपासाचा नोंदविला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पोलिसांनी आत्महत्या दर्शविलेल्या शुभांगी पिलाजी उईकेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप अनेक आदिवासी संघटनांनी केला आहे. या प्रकरणात असलेल्या आरोपींना शिक्षा मिळावी व प्रकरणाला आत्महत्येचे वळण देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करावे या मागणीकरिता मंगळवारी मूलनिवासी आदिवासी समाजबांधव रस्त्यावर उतरला. या मोर्चात सहभागी समाजबांधवांनी पोलीस प्रशासनाचा चांगलाच निषेध नोंदविला.
गोंडवाना मूलवंशी संघटनेच्यावतीने पुकारलेल्या या मोर्चात विदर्भातील जिल्ह्यातून समाजबांधव सहभागी झाले होते. आर्वी मार्गावरील कारला चौक परिसरातील शनीमंदिर परिसरात असलेल्या मैदानावरून निघालेला हा मोर्चा मुख्य मार्गाने बजाज चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून जिल्हाकचेरीवर धडकला. या मोर्चाला डॉ. आंबेडकर चौकात रोखण्यात आले. येथून एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनात शुभांगीची आत्महत्या नाही तर तिचा बलात्कार करून हत्या करण्यात आली असून या दिशेने तपास करण्याची मागणी करण्यात आली. शिवाय पोलिसांनी या प्रकरणात पुरावे नष्ट करून आत्महत्येचा देखावा निर्माण केला आहे. दहेगाव (गो.) पोलीस ठाण्यात असलेल्या काही कर्मचाऱ्यांकडून सदर प्रकरण हाताळताना मोठी हयगय केल्याचा आरोपही करण्यात आला.
पोलिसांकडून सदर प्रकरण दडपण्याचा आरोपही या मोर्चात सहभागी समाजबांधवांकडून करण्यात आला. मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात पोहोचला असता मोर्चाचे रूपांतर एका सभेत झाले. यावेळी मोर्चात सहभागी काही ज्येष्ठ सदस्यांनी या प्रकरणात मृतक शुभांगीला जर न्याय मिळाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला.
आज निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व अवचितराव सयाम, चंद्रशेखर मडावी, निलेश पेंदाम, सचिन नरते, शंकर उईके, राहुल गेडाम यांनी केले.
आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा
मैत्रिणीच्या साक्षगंधाला गेलेली शुभांगी परत आली नसल्याने तिचे आई-वडील पोलिसांकडे तक्रार करण्याकरिता गेले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना परत पाठविले. यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा विवस्त्र मृतदेह आढळून आला. तिने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले; पण परिस्थितजन्य पुराव्यांवरून तिची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप शुभांगीच्या आई-वडिलांसह अनेक आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. हत्या झाल्याचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत; पण पोलिसच प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यामुळे हत्येच्या प्रकरणात आत्महत्येचा बनाव निर्माण करणाºया पोलिसांना निलंबित करावे, अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
युवकांकडून रस्ता रोकोचा प्रयत्न
शनी मंदिर परिसरातून निघालेला हा मोर्चा आर्वी नाका परिसरात पोहोचला असता मोर्चात सहभागी युवकांकडून रस्ता रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिसांनी वेळीच सतर्कता बाळगल्याने तो प्रयत्न फसला. यानंतर मोर्चा ठाकरे मार्केट परिसरात पोहोचला असता येथेही रस्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र मोर्चात सहभागी ज्येष्ठांनी नागरिकांना वेठीस धरणे योग्य नाही, असे म्हणताच युवकांनी सदर प्रकार टाळला.
मोर्चात युवकांचा अधिक समावेश
शुभांगीच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांकडून तपासात होत असलेल्या हयगयीच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात मोठ्या प्रमाणात युवकांचा सहभाग असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडून पोलिसांच्या कार्यवाहीचा चांगलाच निषेध नोंदविण्यात आला. पोलिसांकडून जर या प्रकरणात दोषी असलेल्यांना अटक करण्यात आली नाही तर यापेक्षा मोठे आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

Web Title: Tribal society on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून