उष्णतामानाने संत्राबागा करपल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 10:39 PM2018-05-15T22:39:24+5:302018-05-15T22:39:24+5:30
गत पंधरा दिवसांपासून तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. शिवाय विहिरींच्या पाण्याची पातळ खाली जात आहे. काही विहिरींनी तसेच कुपनलिका व नदी- तलाव तळ दाखवत असल्याने संत्राउत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलगाव (लवणे) : गत पंधरा दिवसांपासून तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. शिवाय विहिरींच्या पाण्याची पातळ खाली जात आहे. काही विहिरींनी तसेच कुपनलिका व नदी- तलाव तळ दाखवत असल्याने संत्राउत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे. सध्या उष्णतामानामुळे संत्रा, मोसंबी आदींची झाड करपत असल्याने ती जगविण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शनाची गरज आहे. शिवाय तशी मागणी परिसरातील संत्रा उत्पादकांची आहे.
गेल्या वर्षी पाऊस बºयापैकी राहिला. परंतु, आधुनिक यंत्रांच्या सहाय्याने विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात जमिनीतून पाण्याचा उपसा करण्यात आल्याने संध्या या भागातील भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. विहिरी, कुपनलिकांनी तळ गाठल्यामुळे बागा वाचविण्यासाठी जीवाचे रान शेतकऱ्यांना करावे लागत आहे. काही बागायतदार पाणी विकत घेऊन टँकरने ते विहिरीत टाकत आहेत. तर हेच विहिरीतील पाणी सध्या या संत्रा व मोसंबीच्या झाडांना देऊन त्यांना वाचविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून होत आहे. मे महिना अर्ध्यावर आला आहे. त्यामुळे सुर्यनारायणही चांगलाच आग ओकू पाहत आहे. त्यामुळे संत्राचे झाड खाली माना टाकत आहेत. यंदा वेळीच पाऊस न झाल्यास फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.
जोरदार पाऊस येण्यासाठी अजुनही एक महिन्याचा कालावधी बाकी असल्यामुळे पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे बागा वाचवायच्या कशा, असा प्रश्न बागायतदारांपुढे उभा आहे. या भागातील बागा वाढत्या उन्हामुळे करपत असल्याने कृषी विभागाच्यावतीने सदर बागायतदार शेतकऱ्यांना तात्काळ योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे. तशी शेतकऱ्यांची मागणीही आहे.
शासकीय मदतीची मागणी
संत्रा, मोसंबी, बागावर नेहमीच येणाऱ्या किडीमुळे बागायतदारांना महागडी किटकनाशके विकत घेवून त्यांची फवारणी करावी लागते. शिवाय मजूरीच्या दरातही मोठी वाढ झाल्याने बागायतदार मेटाकुटीस आला आहे. गत फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीटीमुळे संत्रा बागायतदारांना मोठा आर्थिक फटकाच सहन करावा लागला. वाढत्या उन्हासह पाण्याचा कमतरतेमुळे बागायतदार शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून त्यांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.