तारकुंपणामुळे शेतकऱ्यांची वहिवाट अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:21 AM2018-02-24T00:21:21+5:302018-02-24T00:21:21+5:30
सी.ए.डी. कॅम्प पुलगावच्यावतीने पडीक जमिनीवर तारकुंपण केल्यामुळे जामनी येथील शेतकऱ्यांचा वहिवाटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेताकडे जाण्यासाठी रस्ताच राहिला नसल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून या प्रकरणी संबंधितांनी योग्य कार्यवाही करावी, .....
ऑनलाईन लोकमत
चिकणी(जामणी) : सी.ए.डी. कॅम्प पुलगावच्यावतीने पडीक जमिनीवर तारकुंपण केल्यामुळे जामनी येथील शेतकऱ्यांचा वहिवाटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेताकडे जाण्यासाठी रस्ताच राहिला नसल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून या प्रकरणी संबंधितांनी योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.
गत कित्येक वर्षापासून जामणी चिकणी परिसरातील शेतकरी वहीवाटी करीता सी. ए. डी. कॅम्पच्या जागेतुनच ये-जा करत होते. बैलबंडी तथा वाहने याच रस्त्याने ने-आण केल्या जायची. या मार्गावर परिसरातील सुमारे २५ शेतकऱ्यांच्या शेतजमीनी आहेत. परंतु, तारांचे कुंपन टाकण्यात आल्याने शेतकऱ्यांनी शेतात जावे कसे असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. यंदाच्या हंगामातील विविध पीक सध्या अंतिम टप्प्यात आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतातच कापूस व तूर पडून आले. शिवाय सध्या चणा पिकाच्या मळणीच्या कामांना वेग दिल्या जात आहे. परंतु, रस्ताच बंद झाल्याने शेतातील पीक घरी कसे आणावे असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी देवळीच्या तहसीलदारांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. मात्र, त्यावर अद्यापही कुठलीही कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांची समस्या कायम आहे. स्थानिक महसूल प्रशासन व सी.ए.डी.कॅम्प पुलगाव यांची या प्रकरणात सामज्यस्यांने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेत त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. शिवाय वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे.