ट्रक-कंटेनरची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 10:15 PM2019-07-20T22:15:41+5:302019-07-20T22:16:27+5:30
येथील वणा नदीच्या पुलाच्या दुरूस्तीचा विषय अजूनही मार्गी लागला नसतानाही सध्या मनमर्जीने टोल वसुली केली जात आहे. अशातच धोकादायक ठरणाऱ्या याच पुलावर भरधाव ट्रक आणि कंटेनर समोरासमोर धडकले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : येथील वणा नदीच्या पुलाच्या दुरूस्तीचा विषय अजूनही मार्गी लागला नसतानाही सध्या मनमर्जीने टोल वसुली केली जात आहे. अशातच धोकादायक ठरणाऱ्या याच पुलावर भरधाव ट्रक आणि कंटेनर समोरासमोर धडकले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेची नोंद हिंगणघाट पोलिसांनी घेतली आहे. गंभीर जखमीला नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
येथील नागपूर-हैदराबाद महामार्गावरील वणा नदीच्या पुलावर एम.एच. ४०-९९७३ क्रमांकाचा कंटेनर आणि टी.एस. १२ यू.बी. १८११ क्रमांकाच्या मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात ट्रक चालक मुजीब एम. खान (४९) रा. बहादुरपुरा हैदराबाद याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसºया वाहनाचा चालक अनिलकुमार यादव (३२) हा गंभीर जखमी झाला. ट्रक हा हैद्राबाद येथून नागपूरच्या दिशेने जात होता. तर कंटेनर हैद्राबादच्या दिशेने जात होता. दोन्ही वाहने वणा नदीच्या पुलाजवळ आली असता त्यांची समोरासमोर धडक दिली. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमीला तातडीने रुग्णालयाकडे रवाना केले. विशेष म्हणजे, वणा नदीच्या जुन्या पुलावरून मागील एक वर्षांपासून वाहतूक बंद आहे. दुरुस्तीच्या कारणावरून या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी अद्यापही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने एकाच पुलावरून सध्या वाहनांची ये-जा होते. अशातच हा अपघात झाल्याची चर्चा घटनास्थळी होती. दोन्ही वाहने समोरासमोर भिडल्याने दोन्ही वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच जमादार विनोद कांबळे आणि पोलीस शिपाई शैलेश भालशंकर यांनी घटनास्थळ गाठून जेसीबीच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहनातून मृतकाला बाहेर काढले. शिवाय पंचनामा केला. या अपघातामुळे काही वेळाकरिता या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. परंतु, पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त वाहन वेळीच बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
कारच्या धडकेत एक ठार; एक जखमी
हिंगणी - येथील सेलू मार्गावर कारने दुचाकीला धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. श्याम ईश्वर साबळे (३७) रा. केळझर, असे मृतकाचे तर दिनेश बोंदाडे (३०) रा. केळझर असे जखमीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राप्त माहितीनुसार, श्याम व दिनेश हे बोरधरण येथून केळझरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. विशेष म्हणजे, जखमीच्या मदतीला आॅटो चालक महेश बंडेवार, धीरज दुर्गे हे धावून आले. त्यांनी जखमीला तातडीने मिळेल त्या वाहनाने रुग्णालयाकडे रवाना केले.