ट्रकने ऑटोला चिरडले, चार ठार, तीन जखमी

By रवींद्र चांदेकर | Published: August 5, 2024 03:12 PM2024-08-05T15:12:43+5:302024-08-05T15:13:11+5:30

केळापूर शिवारातील घटना : सर्व मृतक केळापूरचे रहिवासी

Truck crushes auto, four killed, three injured | ट्रकने ऑटोला चिरडले, चार ठार, तीन जखमी

Truck crushes auto, four killed, three injured

पुलगाव (वर्धा) : येथून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या वर्धा मार्गावरील केळापूर गावाजवळ अज्ञात ट्रकने आटोरिक्षाला अक्षरश: चिरडले. या अपघातात ऑटोमधील दोघांचा जागीच, तर दोघांना उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू झाला. इतर तीन गंभीर जखमींवर सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी सकाळी ११:१५ वाजेच्या सुमारास घडली.

दुर्गाबाई सुरेश मसराम, सतीश नेहारे, सुमित्रा करोती आणि भीमराव पाटील, अशी मृतकांची नावे आहेत. सर्व मृतक केळापूर येथील रहिवासी आहेत. ट्रकच्या धडकेत आटोरिक्षाचा पूर्णत: चेंदामेंदा झाला आहे. ऑटोमधील साक्षी नरोडे या महिलेचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. ऑटोचालक सागर मराठे व इतर गंभीर जखमींना पुलगाव ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी सावंगी येथे पाठविण्यात आले आहे.

केळापूर येथील काही गावकरी ऑटोरिक्षाने (क्र. एमएच ३२/बी ७३५६) पुलगाव येथे बाजारासाठी निघाले होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या ऑटोला उडविले. हा अपघात इतका भीषण होता की त्यात ऑटो पूर्ण क्षतीग्रस्त झाला. घटनास्थळी मृत्युमुखी पडलेले दुर्गा मसराम व सतीश निहारे यांचे मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. घटनेची माहिती मिळताच केळापूर येथील नागरिकांनी त्वरित घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.

तालुक्यात अपघात सप्ताह
देवळी तालुक्यात या आठवड्यात झालेल्या अपघातात सात जणांना आपले प्राण गमवावे लागले. यापैकी दोन अपघात हे पुलगाव ते वर्धा मार्गावर घडले आहेत. तिसरा अपघात रविवारी देवळीनजीक झाला. आठवडाभरात झालेल्या भीषण अपघातांमुळे तालुका हादरून गेला आहे. वर्धा ते पुलगाव मार्गावर या सप्ताहात पाच जणांना, तर देवळी येथे दोघांना प्राण गमवावे लागले.

आठवडी बाजार उठला मुळावर
पुलगाव येथे सोमवारी आठवडी बाजार भरतो. लगतच्या ग्रामीण भागातील ग्राहक या बाजारात येतात. केळापूर येथील ग्राहकही ऑटोरिक्षाने पुलगावकडे निघाले होते. मात्र, अपघात झाल्याने आठवडी बाजार त्यांच्या मुळावर उठला.

Web Title: Truck crushes auto, four killed, three injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.