ट्रक-ट्रॅव्हल्सची धडक; २२ प्रवासी जखमी
By admin | Published: June 8, 2017 02:27 AM2017-06-08T02:27:07+5:302017-06-08T02:27:07+5:30
वर्धा ते वायगाव (नि.) मार्गावर नवोदय विद्यालयाजवळ ट्रॅव्हल्स व ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली.
सेलूकाटे जवळील अपघात : तिघांची प्रकृती चिंताजनक, सामान्य रुग्णालयात उपचार सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
वायगाव (नि.) : वर्धा ते वायगाव (नि.) मार्गावर नवोदय विद्यालयाजवळ ट्रॅव्हल्स व ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातात चालकांसह २२ प्रवासी जखमी झाले. यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. हा अपघात ११.३० वाजताच्या सुमारास घडला.
लिलाबाई चंद्रभान येल्ले (६५), कमलबाई बापुराव राऊत (६५), वामन पंजाबराव ताडाम (४०), गणेश नरेंद्र बनकर (५६), कौशल्या लक्ष्मण जुमनाके (४०) सर्व रा. हिंगणघाट, अजय उत्तम कुमरे (१८), सुभाष गणपत कोडापे (३१), मधुकर गुलाब परतेकी (३५) रा. रोठा, आदित्य जगदीश दिवे (१३), आशा जगदीश दिवे (३५) रा. वडनेर, बाबाराव तुळशीराम कुभारे (५२) सिंदी (मेघे) वर्धा, विनीत पुरूषोत्तम पवार (४२), दीपक रामदास पवार (५१) रा. सोनेगाव (स्टे.), अजय पंजाब कुमरे (१८) रा. मजरा (चाका) अशी जखमींची नावे आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. आठ किरकोळ जखमी उपचार घेऊन परस्पर निघून गेल्याने नावे कळू शकली नाही.
लखनसिंग ठाकूर यांच्या मालकीचा एमएच २७ एक्स ५६३४ क्रमांकाचा ट्रक विटा भरून वर्धा येथून राळेगावला जात होता. दरम्यान, हिंगणघाट येथून वर्धेकडे जाणाऱ्या एमएच ३२ बी ६६९६ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने ट्रकला जबर धडक दिली. यात ट्रॅव्हल्सचा समोरचा भाग चक्नाचूर झाला तर ट्रक पलटी झाला. अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांसह २२ जण जखमी झाले. जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची देवळी पोलिसांनी नोंद घेतली.
अधिकाऱ्यांना माणुसकीचा विसर
नवोदय विद्यालयजवळील भीषण अपघातात २२ जण जखमी झाले. यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी वाहन मिळत नव्हते. १०८ या क्रमांकावर फोन लागत नव्हता. दोन आॅटो चालकांनी आपले प्रवासी उतरवून जखमींना वर्धा रुग्णालयात नेले. खासगी वाहन चालक जखमींना बसू देत नव्हते. दरम्यान, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तिकीट तपासणीस पथकाचे वाहन आले. यात दोन अधिकारी व एक चालक होते. त्यांना दोन रुग्णांना त्वरित वर्धा रुग्णालयात घेऊन जाण्याची विनंती केली; पण त्यांनी साफ नकार देत परिवहन मंडळाला माणुसकीचा विसर पडल्याचा परिचय दिला.