ईश्वराकडे नेणारा खरा संत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:35 AM2017-12-23T00:35:06+5:302017-12-23T00:35:25+5:30
समाजाच्या सुखात आपले सुख आणि दु:खात आपले दु:ख जो बघतो. शिवाय आपल्या सुख-दु:खात जो सामान्य राहून भाविकांना ईश्वराकडे जाण्याचा खरा मार्ग सांगतो; तोच खरा साधू-संत आहे, अशी माहिती भागवत कथा प्रवक्ता जयाकिशोरीजी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : समाजाच्या सुखात आपले सुख आणि दु:खात आपले दु:ख जो बघतो. शिवाय आपल्या सुख-दु:खात जो सामान्य राहून भाविकांना ईश्वराकडे जाण्याचा खरा मार्ग सांगतो; तोच खरा साधू-संत आहे, अशी माहिती भागवत कथा प्रवक्ता जयाकिशोरीजी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
जयाकिशोरीजी पुढे म्हणाल्या, नुकतेच आपण कलकत्ता येथून बी.कॉम. पूर्ण केले आहे. आपण ठिकठिकाणी ‘नानीबाईचा मायरा’ व ‘श्रीमद् भागवत कथा’ नागरिकांना समजावून सांगतो. फार कमी वयात एक कीर्तन ऐकून आपण याकडे वळलो. कूमारविष्णू यांचे ‘कभी प्यासे को पाणी पिलाया नही... बाद अमृत पिला नेसे क्या फायदा’ हे भजन आपल्या हृदयाला स्पर्श करून गेले. दहावीपर्यंत या कामासाठी फार कमी सवड मिळत होती. मात्र, महाविद्यालयात गेल्यानंतर थोडी जास्त सवड या कार्यासाठी आपणाला मिळाली असून समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे कार्य आपण सध्या करीत आहोत. कथेच्या माध्यमातून जे दान आम्हाला प्राप्त होते त्यातून आम्ही दिव्यांग बांधवांना मदत करतो. स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी आपण कथेच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. बाल वयात व प्रत्येक घरातील तरुणांवर आई-वडील व घरातील वृद्ध योग्य संस्कार करीत असतात;पण सध्या वृद्धाश्रमात घरातील वृद्धांना रवाना केले जात आहे. हा प्रकार निंदनिय आहे. घरातील वातावरण भक्तीमय असावे. यामुळे चुकीच्या कामांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आळा बसतो. युवकांनी नेहमीच आई-वडिलांसह घरातील वयोवृद्धांचा आदर करावा, असेही त्या म्हणाल्या.
नारायण सेवा संस्थेचे कुंजबिहारी मिश्रा म्हणाले की, कथेच्या माध्यमातून प्राप्त होणारे दान नारायण सेवा संस्थेत जमा होते. शासकीय निधी व दानातून मिळालेल्या पैशातून संस्थेने आतापर्यंत ३ लाख २७ हजार दिव्यांग बांधवांवर शस्त्रक्रिया केली. तर १२ हजार ५०० दिव्यांग बांधव शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहे. यावेळी विपीन चोरडीया यांची उपस्थिती होती.