शेतकऱ्यांना कर्ज प्रक्रियेत आणण्याचे प्रयत्न व्हावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:18 AM2018-03-14T00:18:53+5:302018-03-14T00:18:53+5:30
पैश्याअभावी अनेक शेतकऱ्यांना शेती करणे अडचणीचे ठरते. अशावेळी बँकांनी शेतकऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद देणे महत्त्वाचे असते.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : पैश्याअभावी अनेक शेतकऱ्यांना शेती करणे अडचणीचे ठरते. अशावेळी बँकांनी शेतकऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद देणे महत्त्वाचे असते. त्यामुळे यावर्षी कर्ज प्रक्रियेत समाविष्ट नसलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्ज प्रक्रियेत आणण्यासाठी प्रयत्न करावेत. २०१८-१९ या आर्थिक वर्षांत दीड लाख शेतकऱ्यांना ८५० कोटी रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवून ते पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना घरपोच कर्ज वाटप करण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना स्व. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिल्यात.
शेती व शेतकऱ्यांशी संबंधित विषयांचा त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने, कृषी सहसंचालक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कल्पना जुईकर, उपजिल्हाधिकारी स्मिता पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, तसेच इतर विभाग प्रमुख उपस्थित होते. शेतीमध्ये रासायनिक खतांचा जास्त वापर होत असल्यामुळे किडणी खराब होण्याचे प्रमाण ग्रामीण भागात वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती करण्यासाठी प्रोत्साहित करावे. जमीन आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेती करण्याच्या पद्धतीत खताचा, सेंद्रीय खताचा वापर करण्याचा पद्धतीत काय बदल झालेत याचा अभ्यास करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी कृषी अधिकाऱ्यांना दिल्यात.
वर्धेत शेतकरी तूर विकण्यापेक्षा डाळ करून विकत आहेत. याबाबत त्यांनी समाधान व्यक्त करून शेतकऱ्यांना साठवणुकीसाठी गोदाम उपलब्ध करून द्यावे, असे सांगितले. तसेच शेतकºयांच्या मुलांना व्यवसाय उभारण्यासाठी मुद्रा बँक योजनेतून जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करावा अशा सूचनाही त्यांनी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक वामन कोहाड यांना केल्यात.
अन्न सुरक्षा योजनेचा आढावा घेताना जिल्हा प्रशासनाने अंत्योदय मध्ये इष्टांकापेक्षा जास्त रेशन कार्ड दिल्याबद्दल कोतुक केले. तसेच ज्या व्यक्तीकडे एक पेक्षा जास्त रेशन दुकाने आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची सुचना केली. वर्धा जिल्ह्यात रेशन कार्ड शंभर टक्के आधार लिंकिंग झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
कृषी पंप वीज जोडणीचा आढावा घेताना त्यांनी प्रलंबित जोडणीसाठी शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा करावा, असे सांगितले. उन्हाळा आणि पाणी टंचाई सुरू झाली असताना ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांचा विद्युत पुरवठा खंडित करू नये, अशा सुचना दिल्यात. खंडित केलेला वीजपुरवठा तात्काळ जोडण्यात यावा, असेही सांगितले. ग्रामीण भागात आरोग्य आणि शिक्षणावरील खर्च कमी करण्यसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा परिषद शाळा उत्तम कराव्यात. आज गावाबाहेर इंग्रजी शाळेत जाणारी गावातील मुले पुन्हा जिल्हा परिषद शाळांमध्ये येण्यासाठी जिल्हा परिषद शाळेत सेमी इंग्रजी माध्यम सुरू करावे. यामुळे शेतकऱ्यांचा मुलांच्या शिक्षणावरील खर्च कमी होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
कृषी विभागाच्यावतीने येथील लोक महाविद्यालयाच्या मैदानावर कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला भेट देत किशोर तिवारी यांनी पाहणी करून असलेल्या स्टॉलची माहिती घेतली.