मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 10:09 PM2019-07-13T22:09:33+5:302019-07-13T22:10:34+5:30
वेळोवेळी निवेदन देऊनही आर्वी नगर परिषदेत झालेल्या गैरप्रकाराची शहानिशा करण्यासाठी चौकशी समिती गठित करण्यात येत नाही. उलट मनमर्जीचा अवलंब करणाऱ्यांना विविध कामांचे कंत्राटदेऊन हित जोपासले जात आहे, असा आरोप करीत शनिवारी स्थानिक नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर युवा स्वाभिमान पार्टीच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : वेळोवेळी निवेदन देऊनही आर्वी नगर परिषदेत झालेल्या गैरप्रकाराची शहानिशा करण्यासाठी चौकशी समिती गठित करण्यात येत नाही. उलट मनमर्जीचा अवलंब करणाऱ्यांना विविध कामांचे कंत्राटदेऊन हित जोपासले जात आहे, असा आरोप करीत शनिवारी स्थानिक नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर युवा स्वाभिमान पार्टीच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न झाला. सदर आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनीही आपल्या हालचालिंना वेग देत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
मागील दोन वर्षांपासून युवा स्वाभिमान पार्टीद्वारे आर्वी नगर परिषदेत झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात कारवाईची मागणी करीत आहे. त्यासंबंधाने संबंधितांना निवेदन देण्यात आले. परंतु, कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा ठपका यावेळी आंदोलनकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर ठेवला. यापूर्वी युवा स्वाभिमान पार्टीचे विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे व स्वाभिमानी सैनिक यांनी न.प द्वारा घनकचरा संकलन विलगीकरण व प्रक्रिया कंत्राटात होत असलेला भ्रष्टाचार पुराव्यासहित उघड केला. शेवटी पाठपुरावा व ठोस पुराव्यांसमोर न. प सत्ताधारी झुकले. तसेच मुख्याधिकारी, संबधीत अधिकारी व सत्ताधाºयांच्या मर्जीतील कंत्राटदाराचा कंत्राटच रद्द करावा लागला; पण मुख्यधिकारी विद्याधर अंधारे यांनी कंत्राटदाराशी केलेले आर्थिक साटेलोटे यामुळे कार्यवाहीसाठी त्यांचे हात धजावले नाही व भ्रष्टाचार सिद्ध झाल्यावर तसेच न प च्या सर्वसाधारण सभेत स्पष्ट लिखित ठराव घेतल्यावर ही मुख्याधिकारी अंधारे यांची कंत्राटदाराला न.प. मध्ये असलेली अनामत रक्कम कशी परत देता येईल याच्यासाठी पायपीट सुरु आहेत. सदर गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी संबंधितांना निवेदन देऊन करण्यात आली. परंतु, त्यांच्याकडूनही दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, अद्यापही कुठलीही कारवाई झालेली नाही. याचाच निषेध नोंदविण्यासाठी आणि विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न युवा स्वाभिमान पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. या आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनीही तातडीने आंदोलनस्थळ गाठून आंदोलनकर्ते दिलीप पोटफोडे आणि सिद्धांत कळंबे यांना ताब्यात घेत अटक केली.