टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 03:59 AM2024-09-21T03:59:51+5:302024-09-21T04:00:41+5:30

वर्धा येथील स्वावलंबी मैदानात शुक्रवारी पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा पार पडला. त्यावेळी मोदी यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

Tukde Tukde Gang, Urban Naxalites are running Congress PM Narendra Modi | टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात

टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात

वर्धा : भाषा, बोली, परदेशात देशविरोधी वक्तव्य, देश तोडण्याची भाषा, संस्कृती आणि आस्थांचा अपमान करणे, ही विरोधकांची प्रवृत्ती आहे. टुकडे टुकडे गँग आणि अर्बन नक्षलवादी आज काँग्रेस पक्षाला चालवत आहेत, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

वर्धा येथील स्वावलंबी मैदानात शुक्रवारी पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा पार पडला. त्यावेळी मोदी यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्यातून त्यांनी देश एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्ली काँग्रेसचे तुष्टीकरणाचे भूत जागे झाले असून, कर्नाटकात त्यांनी चक्क गणपती बाप्पालाच पिंजऱ्यात कैद केले.  ही महात्मा गांधी यांची काँग्रेस असूच शकत नाही. काँग्रेसचे नेते परदेशात जाऊन देशविरोधी अजेंडा चालवितात. मात्र, आम्हाला परंपरा, संस्कृती, सन्मान, विकासासोबत एकत्र व्हायचे आहे. महात्मा गांधी यांनी ग्रामीण विकासासाठी कुटीर उद्योगाचा मंत्र दिला. मात्र, देशावर ७० वर्षे राज्य करणाऱ्या काँग्रेसने त्यांच्या विचारांना तिलांजली दिली, असे माेदी म्हणाले.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री जितनराम मांझी, जयंत चौधरी, उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस व अजित पवार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री उदय सामंत, चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते.         

काँग्रेसवर पंतप्रधानांचे वार

आज देशातील सर्वाधिक भ्रष्ट आणि बेईमान पक्ष जर कोणता असेल तर तो काँग्रेस आहे. देशातील सर्वाधिक भ्रष्ट परिवार जर कोणता असेल तर तो काँग्रेसचा शाही परिवार आहे.

एकेकाळी महात्मा गांधीच्या पक्षाशी जुळले होते तो हा काँग्रेस पक्ष नाही. आजच्या काँग्रेसला गणपती पूजेचीही चीड आहे. महाराष्ट्र गणपतीची आराधना करीत होता आणि कर्नाटकात गणपतीची मूर्ती पोलीस व्हॅनमध्ये होती.

१४ लाख कारागिरांना लाभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीएम विश्वकर्मा योजनेचा राज्यातील १४ लाख ७२ हजार कारागिरांना लाभ मिळाल्याचे यावेळी सांगितले.

राज्यातील सहा कोटी महिला आत्मनिर्भर झाल्याचे सांगितले. वन नेशन, वन इलेक्शन निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. कुणी कितीही प्रयत्न केला तरी देशातील आरक्षण संपवू शकत नसल्याचेही ते म्हणाले.

Web Title: Tukde Tukde Gang, Urban Naxalites are running Congress PM Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.