तीन हजारांची लाच स्वीकारताना तलाठी गजाआड
By admin | Published: July 15, 2015 02:39 AM2015-07-15T02:39:14+5:302015-07-15T02:39:14+5:30
तालुक्यातील लहान वणीचे तलाठी गणेश तमगीरे यांना तीन हजारांची लाच घेताना डॉ. आंबेडकर चौकातील एका दुकानात लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.
हिंगणघाट : तालुक्यातील लहान वणीचे तलाठी गणेश तमगीरे यांना तीन हजारांची लाच घेताना डॉ. आंबेडकर चौकातील एका दुकानात लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी सांयकाळी ५.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, हिंगणघाट येथील चोखोबा वॉर्डातील नरेंद्र भगत याच्या पत्नीच्या नावे लहान वणी येथे सहा एकर शेती आहे. त्यांना गत वर्षीच्या अतिवृष्टीत झालेल्या नुकसानापोटी शासनाकडून मार्च २०१५ मध्ये १० हजार रुपयांची मदत जाहीर झाली. ती रक्कम मिळण्याकरिता या मदतीमधील तीन हजार रुपयांची मागणी तलाठी तमगीरे यांनी केल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. यावरून येथील आम आदमी पार्टीच्यावतीने मंगळवारी सकाळी शहरात भ्रष्ट प्रशासन व शासन अधिकाऱ्याविरूध्द पत्रक वितरीत करण्यात आले. त्यामुळे फिर्यादी भगत यांनी आरटीआय कार्यकर्ते मनोज रूपारेल यांच्याशी संपर्क साधून लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा रचून सायंकाळी डॉ. आंबेडकर चौकात तक्रार कर्त्याच्या टेलरिंगच्या दुकानात तमगीरेला तीन हजार रुपये घेतांना रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे उपविभागीय अधिकारी किशोर सुपारे, पोलीस निरीक्षक अनिरूध्द पुरी, एएसआय प्रदीप देशमुख, शिपाई कुणाल डांगे, अनुप राऊत, रागीनी हिवाळे, पल्लवी बोबडे, श्रीधर उईके यांनी केली.(तालुका प्रतिनिधी)