तुलसी,राशी कंपनीच्या वाणावर सर्वाधिक बोंडअळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 11:37 PM2019-08-14T23:37:35+5:302019-08-14T23:38:27+5:30
आर्वी तालुक्यातील हरदोली, रसुलाबाद, पिंपळगाव, माळेगाव (ठेका) आदी शेतशिवारातील कपाशी पिकावर सध्या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याचे कृषी विभागाच्या सर्वेक्षणात पुढे आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आर्वी तालुक्यातील हरदोली, रसुलाबाद, पिंपळगाव, माळेगाव (ठेका) आदी शेतशिवारातील कपाशी पिकावर सध्या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याचे कृषी विभागाच्या सर्वेक्षणात पुढे आले आहे. विशेष म्हणजे गुलाबी बोंडअळी तुलसी आणि राशी कंपनीच्या कपाशीच्या वाणावर आढळून आला असून तसा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने शासनाकडे पाठविला आहे.
प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात कपाशी पिकाचे नियोजन एकूण २,३५,५०० हेक्टर क्षेत्रावर करण्यात आले. तर जिल्ह्यात पिकाचे सरासरी क्षेत्र २,०४,२०३ हेक्टर असून सध्यास्थितीत एकूण २,३४,९५७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. नियोजनाच्या क्षेत्राच्या तुलनेत ११५.०६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे तुरळक क्षेत्रामध्ये कपाशी पीक लाल-पिवळे पडत आहे. तर आर्वी तालुक्यातील हरदोली, रसुलाबाद, पिंपळगाव, माळेगाव (ठेका) शेतशिवारातील तुलसी व राशी या कंपनीच्या कपाशीच्या वाणावर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याचे निदर्शनास आले आहे. गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाला वेळीच आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे, अशा सूचना शेतकऱ्यांना कृषी विभागाच्यावतीने गावतापळीवर दिल्या जात आहे. विशेष म्हणजे तुलसी व राशी कंपनीच्या कपाशीच्या पिकावर सध्या मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याचा अहवाल कृषी विभागाने शासनाकडे पाठविला आहे.
शिवाय सोयाबीन पीक फुलोरा अवस्थेत येत आहे. मात्र, सध्या याच पिकावर हिरवी व करडी उंटअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सेलू तालुक्यातील धपकी, देवळी तालुक्यातील हुरदनपूर व आर्वी तालुक्यातील माळेगाव (ठेका) शेतशिवारातील सोयाबीन पिकावर उंटअळी दिसून आल्याचेही अहवालात नमुद करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
मागील दोन वर्षे गुलाबी बोंडअळीने जिल्ह्यातील कपाशी उत्पादक शेतकºयांच्या अडचणीत भर टाकली. विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात नुकसानही केले. त्यामुळे आर्थिक फटकाच कपाशी उत्पादकांना सहन करावा लागला होता. मात्र हंगामाच्या शेवटी शासनाने नुकसानग्रस्तांना तोकडी मदत दिली. तर अनेक नुकसानग्रस्तांना अद्यापही शासकीय मदतीची प्रतीक्षा आहे.
कामगंध सापळे ठरणार फायद्याचे
सततच्या पावसामुळे कपाशी पीक लाल-पिवळे पडत असल्याने शेतकºयांनी शेतातील पाणी बाहेर कसे काढता येईल यासाठी प्रयत्न करावे.
शिवाय मलुल झालेल्या झाडांच्या बुडात २ ते ३ ग्रॅम युरीया द्यावा. कपाशीचे झाड पायाच्या बोटात धरून दाबावे.
कॉपर आॅक्सिक्लोराईड २५ ग्रॅम अधिक १५० गॅ्रम युरिया व १५० ग्रॅम पोटॅश प्रती लिटर पाण्यात मिसळून तयार केलेले द्रावण प्रती झाड १५० ते १५० मि.ली ड्रेनचिंग करून द्यावे. याच द्रावणाची पिकावर फवारणी केल्यास ते फायद्याचे ठरणारे असल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे शेतकºयांनी शेतात लावावे, असेही सांगण्यात आले.
३४ शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकºयांना दिली जातेय इत्थंभूत माहिती
जिल्ह्यात तूर पीक कपाशी व सोयाबीनमध्ये आंतरपीक म्हणून घेण्यात येते. सध्यास्थितीत जिल्ह्यात एकूण ५९,४९४ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. नियोजनाच्या ९१.५३ टक्के क्षेत्रावर झाली असून सरासरीच्या तुलनेत ७९.७८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सध्यास्थितीत पीक वाढीव अवस्थेत असून पिकाचे उत्पादन वाढ, कीड व रोग व्यवस्थानाबाबत एकूण ३४ शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकºयांना इत्तमभूत माहिती दिली जात आहे.
सोयाबीनवर हिरवी-करडी उंटअळीचा हल्ला
सध्यास्थितीत जिल्ह्यात एकूण १,०७,२२७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. नियोजनाच्या क्षेत्राच्या तुलनेत ८५.६१ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. तर सरासरीच्या तुलनेत ६८.७२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून सध्या सोयाबीन पीक वाढीव अवस्थेत आहे. शिवाय पीक फुलोरा अवस्थेत येत आहे. मात्र, सध्या याच पिकावर हिरवी व करडी उंटअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सेलू तालुक्यातील धपकी, देवळी तालुक्यातील हुरदनपूर आणि आर्वी तालुक्यातील माळेगाव (ठेका) शेतशिवारातील सोयाबीन पिकावर उंटअळी दिसून आली आहे.
पक्षीथांबे ठरणार उपयुक्त
उंटअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकºयांनी शेतात पक्षीथांबे लावल्यास पक्षी ही अळी फस्त करेल. त्यामुळे उंटअळीला अटकाव घालता येता. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करता येते. किडीचे आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास (सरासरी ४ अळ्या प्रती मिटर ओळ) नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस ४० टक्के प्रवाही २० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी पानाच्या खालच्या बाजूने केल्यास त्याचे परिणाम उत्कृष्ट मिळत असल्याचे सांगण्यात आले.