तूर डाळ २० हजार रूपये क्विंटल, तरी तुरीचे भाव पडले
By admin | Published: July 17, 2016 12:32 AM2016-07-17T00:32:26+5:302016-07-17T00:32:26+5:30
गत काही दिवसांपासून बाजारातील तूर डाळीचे भाव २०० रुपये किलो म्हणजेच २० हजार रुपये प्रति क्विंटल झाल्याची ओरड होत आहे.
शेतकऱ्यांमध्ये संभ्रम : तुरीला मिळतात आठ ते साडे आठ हजार रुपये भाव
रोहणा : गत काही दिवसांपासून बाजारातील तूर डाळीचे भाव २०० रुपये किलो म्हणजेच २० हजार रुपये प्रति क्विंटल झाल्याची ओरड होत आहे. मग, तुरीला केवळ आठ ते साडे आठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव का, असा संतप्त सवाल तूर उत्पादक शेतकरी उपस्थित करीत आहेत. शासनाने व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या या लुटीकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
एक क्विंटल तुरीपासून ७० किलो स्वच्छ तूर डाळ तयार होते तर ३० किलो कळणा, कोंडा व दुय्यम प्रतिची डाळ (चूरी) निघते. आज २०० रुपये किलो डाळीचा भाव विचारात घेता व्यापाऱ्याला ७० किलो डाळीचे १४ हजार रुपये मिळतात. व्यापारी कळणा, कोंडा, डाळीची चूरी गोपालकांना जनावरांच्या वैरणासाठी ३० ते ३५ रुपये किलोप्रमाणे विकतात. यातून मिलधारक व्यापाऱ्यांना एक हजार रुपये मिळतात. यावरून एक क्विंटल तुरीतून व्यापाऱ्यांना १५ हजार रुपये मिळतात. तुरीचे डाळीत रूपांतर करण्यासाठी एक हजार रुपये खर्च येत असल्याचे मान्य केले तरी व्यापाऱ्यांना १४ हजार रुपये शिल्लक राहतात. आठ ते साडे आठ हजार रुपये क्विंटल भावाने खरेदी केलेल्या तुरीचे व्यापारी १४ हजार रुपये करतात म्हणजे सहा हजार रुपये कमवितात. यात व्यापारी ७५ टक्के नफा कमवितात. केवळ कच्चा माल पक्का करून विकताना व्यापारी मालामाल होतो आणि उन्ह, वारा व पाऊस या नैसर्गिक आपत्तींना तोंड देत जून ते फेबु्रवारी आठ महिने जोपासणा करून आलेल्या पिकातून अनेकदा खर्चही निघत नाही.
गतवर्षीपासून तुरीला बऱ्यापैकी भाव आहे; पण सर्वत्र ओरड होत आहे. परिणामी, शासन परेदशातून तुरी आयात करून स्वस्त धान्य दुकानातून १२० रुपये किलो भावाने डाळ ग्राहकांना उपलब्ध करून देते. शिवाय तूर व तूर डाळीची साठेबाजी करणाऱ्यांवर कार्यवाही करू, अशा घोषणा करते. या घोषणा अंमलात येत नाही; पण याचा हवाला देत व्यापारी तुरीचे भाव पाडतात. तुरीचे भाव घटले तर तूर डाळीचे भाव कमी होणे क्रमप्राप्त आहे; पण बाजारात असे होत नाही. या घोषणाबाजीत मागील महिन्यात १० हजारांच्या वर गेलेले तुरीचे भाव आठ हजारांवर आले; पण तूर डाळीचा भाव जैसे थे आहे. वास्तविक, तूर डाळ जर २० हजार रुपये क्विंटलने खपत असेल तर तुरीचा भाव किमान १२ हजार रुपये क्विंटल असणे गरजेचे आहे. एका फोनवर भाव पाडणारे व्यापारी संघटीत आहे. यात शेतकऱ्यांची लुट होत आहे. शासन कोणतेही असले तरी घोषणाबाजीच्या पलीकडे काहीच करू शकत नाही. याचा अनुभव आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक लुटीचा मार सहन करावा लागत आहे. हे चित्र पालटणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)
१२ हजार रुपये क्विंटल भाव अपेक्षित
शेतकऱ्यांकडून कमी किमतीत तूर खरेदी करून व्यापारी डाळीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नफा कमवितात. सध्या तूर डाळ २०० रुपये किलो असताना तुरीचे भाव मात्र पाडले गेले आहेत. केवळ आठ ते साडे आड हजार रुपये क्विंटल भाव मिळत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. शेतकऱ्यांना किमान १२ हजार रुपये क्विंटल तुरीचे भाव अपेक्षित आहेत; पण असे झाल्यास व्यापाऱ्यांचा नफा कमी होतो. यामुळे तुरीच्या भावाबद्दल कुणीही बोलायला तयार नसल्याचेच दिसते. मागील महिन्यात १० हजार रुपयांपर्यंत गेलेल्या तुरी आता डाळ महाग असतानाही आठ हजारांवर आल्या आहेत. परिणामी, शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या या लुटीकडे लक्ष देत व्यांपाऱ्यांवर अंकूश कसण्याकरिता उपाययोजना करणे गरजेचे आहे.