दशकापासून जलशुद्धिकरण केंद्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:02 AM2018-04-17T00:02:26+5:302018-04-17T00:02:26+5:30
नागरिकांना पिण्याकरिता शुद्ध पाणी मिळावे याकरिता विरूळ (आकाजी) येथे कोट्यवधी रुपये खर्च करून जलशद्धिकरण केंद्र उभारण्यात आले. हे केंद्र गावाकरिता पांढरा हत्ती ठरत आहे. ते गत दहा वर्षांपासून बंदच असल्याचे येथील नागरिकांना अशुद्ध पाण्यानेच तहाण भागवावी लागत आहे.
सचिन देवतळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विरूळ (आकाजी): नागरिकांना पिण्याकरिता शुद्ध पाणी मिळावे याकरिता विरूळ (आकाजी) येथे कोट्यवधी रुपये खर्च करून जलशद्धिकरण केंद्र उभारण्यात आले. हे केंद्र गावाकरिता पांढरा हत्ती ठरत आहे. ते गत दहा वर्षांपासून बंदच असल्याचे येथील नागरिकांना अशुद्ध पाण्यानेच तहाण भागवावी लागत आहे.
राज्यपाल तथा वर्धेच्या खासदार राहिलेल्या दिवंगत प्रभाताई राव यांच्या काळात कोट्यवधी रुपये खर्च करून गावांत जलशुद्धीकरण केंद्र सुरू करण्यात आले. याकरिता वर्धा नदीवरुन पाईपलाईन टाकण्यात आली. नागरिकांकरिता लाभाची असलेली ही महत्त्वाकांक्षी योजना आज कुचकामी ठरत आहे. योजना राबविण्याच्या निर्णयाला १५ वर्षे झाली. यात दहा वर्षांपासून ती केवळ शोभेची ठरत आहे.
या योजनेचा लाभ गावकऱ्यांना व्हावा याकरिता वर्धा नदीवरुन थेट पाइपलाईन टाकुन गावात पाणी आले. पाण्याच्या शुद्धीकरणाकरिता जलशुध्दीकरण केंद्र उभे झाले. परंतु गत दहा वर्षांपासून वर्धा नदीवरुन टाकलेली पाईपलाईन व जलशुध्दीकरण केंद्र बंदच असल्याने नागरिकांना त्याचा कुठलाही लाभ होत नाही. गावकºयांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत असून अप्रमाणीत पाण्याने तहाण भागवावी लागत आहे.
इमारतीला तडे आणि यंत्रही झाले जीर्ण
विरूळ येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या इतमारतीला तडे गेले असून यात्रील यंत्रही आता जुने झाले आहे. यामुळे ते कुचकामी ठरणार आहे. यावर निधी खर्च करणे शक्य नसून गावांत नवे केंद्र लावण्यात यावे अशी मागणी होत आहे.
वीज देयकही थकले
या जलशुद्धीकरण केंद्राचे देयक थकल्याने वीज पुरवठ्याचे देयक थकीत आहे. यामुळे पाणी पुरवठा योजना आणि जलशुद्धीकरण योजना बंद आहे. याकरिता ग्रामपंचातीने पुढाकार घेत या दोन्ही योजना सुरु केल्या तर विरूळचा पाणी प्रश्न कायमचा मिटेल. गावात भीषण पाणीटंचाई असून सध्या तब्बल १० दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांची पाण्याकरिता पायपीट होत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
गत दहा वर्षांपासून जलशुद्धीकरण केंद्र बंद असल्यामुळे यातील मशनरीज पूर्णपणे खराब झाल्या. जलशुद्धी केंद्राच्या इमारतीला तडे गेल्या असल्यामुळे इमारत जीर्ण झाली आहे. विद्युत बील सुध्दा थकीत असल्यामुळे हे केंद्र सुरू करता येणार नाही. याबाबत नवीन जलशुद्धी केंद्राची मागणी शासनाकडे करणार आहे.
- साधना उईके, सरपंच, विरूळ.