नियोजनशुन्यतेने वीस लाखांचा खर्च खड्ड्यात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 05:00 AM2020-10-29T05:00:00+5:302020-10-29T05:00:07+5:30
नगरपालिकेला वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदान वर्ष २०१८-१९ अंंतर्गत ५ कोटींचे अनुदान प्राप्त झाले होते. या अनुदानातून प्रभाग क्रमांक ८, १०, ११ व १३ मधील धंतोली चौक ते बजाज वाचनालयपर्यंत डॉ. जे. सी. कुमारप्पा मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण याकरिता ४४ लाख ७४ हजार १९१ रुपये आणि प्रभाग क्रमांक १४ व १५ मधील बजाज वाचनालय ते शास्त्री चौकापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याकरिता ५२ लाख १२ हजार ३४३ रुपयाचा कंत्राट नयन एन्टरप्राईजेस यांना देण्यात आला.
लाेकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नगरपालिकेला सत्ताकाळात शासनाकडून भरभरुन निधी मिळाला. पण, पालिकेकडे नियोजनाचा अभाव असल्याने ‘आधी रस्त्याचे बांधकाम आणि लगेच मलनिस्सारण योजनेकरिता खोदकाम’ असा विकासाचा सपाटा सुरु झाला. धंतोली चौक ते शास्त्री चौकापर्यंतचे रुंदीकरण व डांबरीकरणाच्या कामाचा कार्यारंभ आदेश दिल्यानंतर कंत्राटदाराने रस्त्याच्या बाजू भरण्याचे काम पूर्णत्वास नेल्यानंतर कामाला थांबा देत मलनिस्सारणचे काम सुरु केले. यामध्ये केलेल्या कामाची वाट लागली असून यावर केलेला वीस लाखांचा खर्च आता व्यर्थ ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नगरपालिकेला वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदान वर्ष २०१८-१९ अंंतर्गत ५ कोटींचे अनुदान प्राप्त झाले होते. या अनुदानातून प्रभाग क्रमांक ८, १०, ११ व १३ मधील धंतोली चौक ते बजाज वाचनालयपर्यंत डॉ. जे. सी. कुमारप्पा मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण याकरिता ४४ लाख ७४ हजार १९१ रुपये आणि प्रभाग क्रमांक १४ व १५ मधील बजाज वाचनालय ते शास्त्री चौकापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याकरिता ५२ लाख १२ हजार ३४३ रुपयाचा कंत्राट नयन एन्टरप्राईजेस यांना देण्यात आला.
या कामाचा कार्यारंभ आदेश १९ जुलै २०१९ ला देऊन काम पूर्ण करण्याकरिता सहा महिन्याची मुदत दिली होती. शहरात इतर प्रभागांमध्ये मलनिस्सारण योजनेचे काम सुरु असताना या मार्गावरही मलनिस्सारण योजनेकरिता खोदकाम होणार असल्याची माहिती पालिकेला होती. तरीही या मार्गाचे डाबंरीकरण करण्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला. कंत्राटदाराने रुंदीकरणाकरिता रस्त्याच्या बाजू भरण्याचे काम केले. काही काम पूर्णत्वास नेऊन कंत्राटदाराने वीस लाखांचे देयकही उचलेले.
आता पुढील कामाला थांबा दिला असून मलनिस्सारणचे काम सुरु केले. मलनिस्सारणच्या कामात रस्त्याच्या झालेल्या कामाची वाट लागली आहे. गटर वाहिनीचे तयार केलेले चेंबर जवळपास एक ते दीड फुटपर्यंत रस्त्याच्या वर आले असून डांबरीरस्ता आता इतका उंच होणार कसा? असाही प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे आता नगरपालिका हा कंत्राट रद्द करणार की, कंत्राटदार प्राकलनाच्या बाहेर जाऊन या रस्त्याच्या डांबरीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्णत्वास नेणार, याकडे आता वर्धेकरांचे लक्ष लागले आहे. या पालिकेची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
कोट्यवधीच्या रस्त्याची लावली वाट
शहरातील मलनिस्सारण योजनेत शहरील पक्क्या रस्त्यांच्या भगदाड पाडले असून गुळगुळीत रस्ते खडतर करुन ठेवले आहे. आतापर्यंत या योजनेच्या कामात शहरातील जवळपास ५०० कोटींच्या सिमेंट रस्त्यांची वाट लावल्याचा आरोप वर्धेकरांकडून होत आहे. आता हे फोडलेले रस्ते पुन्हा बांधण्याकरिता शासनाच्या तिजोरीवर भार टाकला जाणार आहे. या योजनेच्या कंत्राटदाराने फोडलेले रस्ते दुरुस्त करण्याचे काम केले असून सर्वच रस्ते ओबडधोबड करुन ठेवल्याने अपघाताचा धोका बळावला आहे.
व्हीएनआयटीची चौकशी थंडबस्त्यात
अमृत योजनेअंतर्गत सुरु असलेल्या कामाबाबत कंत्राटदारांनी सुरुवातीपासून मनमर्जी कारभार चालविला. मलनिस्सारण योजनेच्या कामात कंत्राटदाराने सुरक्षा वाऱ्यावर सोडून कामकाज चालविल्याने एका जीव गमवावा लागला तर अनेकांचे अपघात झाले. त्यामुळे या योजनेच्या कामावर देखरेख ठेवण्याकरिता तसेच गुणवत्तादर्शक कामे होण्याकरिता नागपूर येथील व्ही.एन.आ.टी. संस्थेची नियुक्ती करण्याची मागणी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी तत्कालीन पालकमंत्री तथा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. त्यासंदर्भात त्यांनी चौकशीचे आदेशही दिले होते पण, अजुनही ना संस्थेची नियुक्ती झाली ना चौकशी.