साडेतीन लाखांचा दारूसाठा व साहित्य जप्त
By admin | Published: September 18, 2015 01:59 AM2015-09-18T01:59:28+5:302015-09-18T01:59:28+5:30
दारूविक्रीवर आळा घालता यावा म्हणून जिल्ह्यात आॅपरेशन वॉश आऊट राबविले जात आहे. यात वर्धा शहरात गावठी दारूसाठा नष्ट करून साहित्य जप्त करण्यात येत आहे.
वर्धा : दारूविक्रीवर आळा घालता यावा म्हणून जिल्ह्यात आॅपरेशन वॉश आऊट राबविले जात आहे. यात वर्धा शहरात गावठी दारूसाठा नष्ट करून साहित्य जप्त करण्यात येत आहे. बुधवारीही शहर पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेत साडे तीन लाख रुपयांचा दारूसाठा व साहित्य जप्त करण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक स्मीता पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखडे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार एम.पी. बुराडे, पोलीस निरीक्षक वी.आर. मगर यांच्यासह शहर पोलिसांनी आनंदनगर व पुलफैल भागात बुधवारी पहाटे दारूबंदी वॉश आऊट मोहीम राबविली. या कारवाईमध्ये २९ मोठे लोखंडी ड्रम १४ हजार ५०० रुपये, ११ प्लास्टीक ड्रम किंमत २ हजार २०० रुपये, २९ लोखंडी ड्रममधील कच्चा मोहा सडवा, रसायण किंमत २ लाख ९० हजार रुपये, ११ प्लास्टिक ड्रममधील कच्चा मोहा सडवा रसायण किंमत ५५ हजार रुपये, ९ काळ्या बुडाचे लोखंडी ड्रम किंमत २ हजार ७०० रुपये आणि इतर भट्टी साहित्य असा एकूण ३ लाख ६७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सडवा, मोहा, रसायन नष्ट केले गेले. दररोज कारवाई होत असताना तेवढेच साहित्य दुसऱ्या दिवशीही आढळते. दारू गाळणे थांबत नसल्याने कारवाईचा परिणाम जाणवत नसल्याचे दिसते.(कार्यालय प्रतिनिधी)