टॉवरग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार दुप्पट मोबदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 09:51 PM2018-02-18T21:51:40+5:302018-02-18T21:51:53+5:30
शेतांमध्ये टॉवर उभारल्यानंतर दिला जाणारा मोबदला अत्यल्प होता. शिवाय कंत्राटदार मनमानी पद्धतीने तो शेतकऱ्यांना देत होते. याबाबत टॉवर विरोधी कृती समितीने लढा दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : शेतांमध्ये टॉवर उभारल्यानंतर दिला जाणारा मोबदला अत्यल्प होता. शिवाय कंत्राटदार मनमानी पद्धतीने तो शेतकऱ्यांना देत होते. याबाबत टॉवर विरोधी कृती समितीने लढा दिला. त्याला यश आले असून ३१ मे २०१७ रोजी निघालेल्या शासन निर्णयानुसार आता शेतकऱ्यांना दुप्पट मोबदला दिला जाणार आहे.
राज्यात २००८ पासून ४०० केव्ही व त्यापेक्षा अधिक विद्युत वाहिनीची कामे सुरू झाली. ही कामे करताना शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जात नव्हता. यासाठी टॉवर विरोधी कृती समितीचे राज्य अध्यक्ष मिलिंद पाटील व सरचिटणीस अनिल नागरे यांनी राज्यात टॉवरग्रस्तांना मोबदला मिळावा म्हणून आंदोलने केली. याची दखल घेत उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी मंत्रालयात ४० बैठकी घेतल्या. यावरून राज्य शासनाने परिपत्रक काढत ६६ केव्ही व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या अती उच्चदाब पारेषण वाहिणीच्या व्याप्त जागेच्या मोबदल्यात वाढ करणे, वाहिणीच्या तारेखालील जमिनीचा मोबदला देण्याबाबत धोरण ठरविले; पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती. यासाठी संघर्ष केल्याने मोबदला देण्याचे मान्य करण्यात आले आहे. आता शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार दुप्पट मोबदला मिळणार आहे. यासाठी प्रत्येक विद्युत टॉवरग्रस्त शेतकऱ्याने जिल्हाधिकारी तथा तहसीलदार यांच्याकडे अर्ज दाखल करावयाचे आहेत. जिल्ह्यात देवळी व वर्धा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी टॉवरने व्यापल्या आहेत. देवळी येथे पॉवर ग्रीड असल्याने त्याचे प्रमाण अधिक आहे. या शेतकऱ्यांनाही वाढीव मोबदल्यासाठी आता अर्ज करावे लागणार आहेत.
३१ मे २०१७ च्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी होत आहे. यात केवळ ३१ मे २०१७ नंतर उभारण्यात येत असलेल्या टॉवरग्रस्त शेतकºयांना दुप्पट मोबदला दिला जाणार आहे.
- पी.बी. अग्रवाल, अभियंता, महावितरण, वर्धा.