महिलेच्या समयसूचकतेने दोन चोरटे गजाआड
By admin | Published: June 11, 2015 02:03 AM2015-06-11T02:03:45+5:302015-06-11T02:03:45+5:30
घरात चोरटे मुद्देमालाचा शोध घेत असताना एकत्रित झालेल्या नागरिकांनी घराची दोन्ही दारे बाहेरून बंद केली.
आर्वी : घरात चोरटे मुद्देमालाचा शोध घेत असताना एकत्रित झालेल्या नागरिकांनी घराची दोन्ही दारे बाहेरून बंद केली. यामुळे भरदिवसा चोरी करणारे दोन चोरटे पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्या ताब्यातून ३६ हजारांच्या ऐवजासह २० हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली. नागरिकांच्या या धाडसाचे व महिलेच्या सतर्कतेचे मंगळवारी सर्वत्र कौतूक झाले.
शहरातील कन्नमवारनगर मागील भागात असलेल्या पांडुरंग वसाहतीत किशोर पवार नामक शिक्षक वास्तव्यास आहे. रविवारी ते घराला कुलूप लावून अमरावती येथे लग्नाकरिता गेले. दुसऱ्या माळ्यावर असलेल्या किरायेदार वैशाली पुनसे यांना घरावर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. सोमवारी दुपारी परिसर निर्मनुष्य असल्याची संधी साधून दिलावरसिंग राजूसिंग बावरी (१९) व अमनसिंग मानसिंग जुनी (३०) दोन्ही रा. तळेगाव (श्या.पं.) यांनी पवार यांच्या घराच्या समोरील दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुपारी ३ वाजताच्या सुमारास किरायेदार असलेल्या वैशाली पुनसे अंगणात वाळत टाकलेले कपडे काढण्यास आल्या तेव्हा पवार यांच्या घरात आवाज आला. दारावरील कुलूप तुटलेले दिसले. चोरटे घरात आल्याची शंका आल्याने पुनसे यांनी शेजारी राहणाऱ्या कडवे यांना माहिती दिली. कडवे यांनी परिसरातील नागरिकांना एकत्र केले. नागरिकांचा समूह पवार यांच्या घरी पोहोचल्यावर दोन्ही दारे बाहेरून बंद केली. लगेच शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घराची दारे उघडत शोध घेतला. तेव्हा दोन्ही आरोपी घरात दडून बसले होते. त्यांच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र, कानातील रिंग, कानातील झुमके व टॉप्स, असा ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली. या घटनेत महिलेचे कौतुक होत आहे.(तालुका प्रतिनिधी)