बांधकामासाठी आणलेल्या रेतीच्या एकाच ढिगावर दोनदा दंड

By admin | Published: July 24, 2016 12:24 AM2016-07-24T00:24:39+5:302016-07-24T00:24:39+5:30

घराच्या बांधकामांसाठी विकत घेतलेल्या रेतीच्या साठ्यावर कारवाई करता येत नाही.

Twice the penalty on the same heap brought for the construction | बांधकामासाठी आणलेल्या रेतीच्या एकाच ढिगावर दोनदा दंड

बांधकामासाठी आणलेल्या रेतीच्या एकाच ढिगावर दोनदा दंड

Next

आष्टी (श.) : घराच्या बांधकामांसाठी विकत घेतलेल्या रेतीच्या साठ्यावर कारवाई करता येत नाही. असे असले तरी शहरात तसेच तालुक्यात अशाच रेतीसाठ्यावर कारवाई होताना दिसून येत आहे. येथील एका रेतीच्या साठ्यावर तर दोनवेळा दंड आकारण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
गतवर्षी घर बांधकाम करण्यासाठी विकत घेतलेल्या २००० फुट (२०ब्रास) रेतीवर तहसीलदारांनी ६४ हजार रुपये दंड आकारला. त्याच रेतीच्या ढिगावर यावर्षी आणखी दोन लाख ४ हजार रुपये दंड ठोठावला. दंडाची रक्कम त्वरित भरा अन्यथा सातबारावर चढविली जाईल, असा अजब आदेश तहसीलदारांनी काढला. या प्रकरणी तक्रारकर्त्यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन पाठवून घर बांधकाम करणाऱ्यांना तहसीलदार नाहक त्रास देत असून कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.
नवीन आष्टी वसाहतीत राहणारे अनिल दिवाकर कोहळे यांनी नवीन प्लॉट विकत घेतला. मुलांच्या शिक्षणासाठी खेडेगाव सोडून आलेल्या कोेहळे यांनी घर बांधकामासाठी मागील वर्षी २० ट्रॅक्टर रेती घाटधारक अनिल मानकर यांच्याकडून विकत घेतली. या रेतीवर घराचे बांधकाम सुरू करण्यापूर्वीच गतवर्षी ६४ हजार रुपये दंडाची रक्कम आकारण्यात आली. बांधकामाकरिता रेतीसाठा परवानगीची गरज नाही, म्हणून कोहळे यांनी उत्तर दाखल केले. असे असताना लिलाव करण्याची तंबी देत त्यांना ६४ हजार रुपये दंड भरण्यास भाग पाडले. यानंतर यावर्षी अनिल कोहळे यांना तहसीलदारांनी अवैध रेतीसाठा असून लिलाव करण्याची तंबी दिली. तलाठ्यांनी घर बांधकामासाठी रेती असल्याचे सांगितले; पण काहीही ऐकून न घेता तहसीलदार गजभिये यांनी २ लाख ४ हजार रुपये नव्याने रेती चोरी केल्या प्रकरणी दंड आकारला. हा एकच प्रकार नसून बांधकामासाठी आणलेल्या रेतीवरच कारवाई केली जात असल्याचे दिसून येते.
दंडाची रक्कम सात दिवसांत न भरल्यास सातबारावर नोंद करण्याचा आदेश केला. सदर आदेश अत्यंत चुकीचा असल्याचे मत वरिष्ठांनी व्यक्त केले. तहसीलदार गजभिये यांच्याकडून होत असलेल्या अनागोंदीची लेखी तक्रार विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. तहसीलदारांना त्वरित निलंबित करावे, अन्यथा उपोषण करणार असल्याचा इशाराही कोहळे यांनी निवेदनातून दिला.(तालुका प्रतिनिधी)

रेती घाटावरील पोकलँडवर कार्यवाहीस टाळाटाळ
तालुक्यातील भिष्णूर, वाघोली या दोन्ही रेतीघाटात खुलेआम पोकलँडने रेतीचा उपसा सुरू आहे. दिवसाला शेकडो ब्रास रेती उपसली जात आहे. याकडे तहसीलदार फिरकूनही पाहत नाही; पण घर बांधकामासाठी आणलेल्या रेतीवर त्वरित कारवाई केली जाते. यामुळे नागरिकांत संतापाची लाट पसरली असून याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

घर बांधकामाकरिता आणलेल्या रेतीची जप्ती करता येत नाही. सर्वसामान्य जनतेवर अन्याय व्हायला नको, अधिकाऱ्यांना समजावून सांगतो. प्रशासनात वैयक्तिक आकस नकोच. आदेशावर अपील अद्याप आलेली नाही.
- मनोहर चव्हाण, उपविभागीय महसूल अधिकारी, आर्वी.

Web Title: Twice the penalty on the same heap brought for the construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.