दोन एकर ऊस केला डुकरांनी फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 12:07 AM2018-08-06T00:07:43+5:302018-08-06T00:08:48+5:30
शेडगाव येथील बाळकृष्ण काळे यांच्या आजदा शिवारातील शेतातील दोन एकरातील ऊस पीक रानडुक्करांनी नष्ट केले आहे. सदर शेतकऱ्यांचे तीन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. काळे यांनी जानेवारी महिन्यांत ऊसाची लागवड केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : शेडगाव येथील बाळकृष्ण काळे यांच्या आजदा शिवारातील शेतातील दोन एकरातील ऊस पीक रानडुक्करांनी नष्ट केले आहे. सदर शेतकऱ्यांचे तीन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. काळे यांनी जानेवारी महिन्यांत ऊसाची लागवड केली होती. तो ऊस रानडुक्करांनी फस्त केला होता. त्यांनी याबाबतची तक्रार वनविभाग समुद्रपूर यांच्याकडे केली होती. त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही उलट शेतात असलेला उभा असलेला ८० टक्के ऊस रानडुक्करांनी फस्त केला.
बाळकृष्ण काळे यांचे शेडगाव येथे गावाला लागून शेत सर्व्हे नं. ११७ असून सदर शेतामध्ये ऊसाचे पीक हे सात महिन्याचे झाले होते. ३ जुलैच्या रात्री रानडुक्कराने शेतात प्रवेश करून दोन एकर मधील जवळपास संपूर्ण ऊस फस्त केला. त्यामुळे सदर शेतकऱ्यांचे तीन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. सदर शेतकऱ्यांला वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी आहे.
सुरूवातीला बाळकृष्ण काळे यांच्या शेतातील ऊस रानडुकराने उध्वस्त केला होता. त्यांना ४ हजार रुपये मदत केली व आता पुन्हा झालेल्या नुकसानीत पंचनामा करून मदत करण्याचा प्रयत्न वनविभाग करीत आहे.
बी.बी. बाबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, समुद्रपूर
यापूर्वी माझ्या शेतातील ऊसाचे नुकसान झाले ते किमान २ लाखाचे झाले असून त्या बद्दल मला केवळ ४ हजार रूपयांची तोकडी मदत वनविभागाने केली होती. ही मदत अत्यंत कमी आहे.
बाळकृष्ण काळे, शेतकरी, शेडगाव.