२९८ सरपंचपदासाठी चार दिवसांत अडीच हजार अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 12:22 AM2019-03-09T00:22:36+5:302019-03-09T00:23:18+5:30
जिल्ह्यातील २९८ ग्रा.पं.ची निवडणूक येत्या २४ मार्चला होऊ घातली आहे. त्याच अनुषंगाने इच्छुक उमेदवारांकडून सध्या सरपंच व ग्रा.पं. सदस्यपदासाठी आवेदन स्वीकारले जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील २९८ ग्रा.पं.ची निवडणूक येत्या २४ मार्चला होऊ घातली आहे. त्याच अनुषंगाने इच्छुक उमेदवारांकडून सध्या सरपंच व ग्रा.पं. सदस्यपदासाठी आवेदन स्वीकारले जात आहेत. शुक्रवारी, ८ मार्चला दुपारी २ वाजेपर्यंत सरपंचपदासाठी २ हजार ४२२ तर ग्रा.पं. सदस्य पदासाठी ९ हजार २०० इच्छुकांनी आपले आवेदन आॅनलाईन पद्धतीने सादर केल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्यापैकी गुरूवार ७ मार्चपर्यंत सरपंचपदासाठी इच्छुकांचे २१६ तर ग्रा.पं. सदस्यपदासाठी ६१० उमेदवारांचे अर्ज ग्राह्य मानण्यात आले आहेत.
वर्धा जिल्ह्यातील २९८ ग्रा.पं.ची निवडणूक होऊ घातली असून त्यासाठी आदर्श निवडणूक आचारसंहिता संपूर्ण जिल्ह्यात लागू आहे. जिल्ह्यातील या ग्रा. पं. तील एकूण ९४९ प्रभागातील लोकप्रतिनिधी सदर निवडणुकीदरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मतदार निवडून देणार आहेत. सरपंचाची निवड थेट मतदार करणार आहेत. तसेच ही निवडणूक संपताच लोकसभेची निवडणूक आणि त्यानंतर विधानसभेची निवडणूक राहणार असल्याने ग्रामीण भागातील ही निवडणूक विविध राजकीय पक्षांसह लोकप्रतिनिधींसाठी महत्त्वाचीच असल्याचे मानले जात आहे. सरपंच व ग्रा.पं. सदस्यपदासाठी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा शनिवार ९ मार्च अखेरचा दिवस असून किती अर्ज येतात, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.
लोकप्रतिनिधींच्या वाहनांची चाके थांबली
५० टक्क्यांपेक्षा जास्त ग्रा.पं.च्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातलेला वर्धा हा राज्यातील एकमेव जिल्हा असून येथे ग्रा.पं. निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू आहे. यामुळे जि.प., पं. स. न. प. तील लोकप्रतिनिधींना शासकीय वाहने कुठे न्यावी आणि कुठे नेऊ नये, असे निर्बंध घालण्यात आले आहे. आचारसंहितेच्या काळात या लोकप्रतिनिधींच्या शासकीय वाहनाचा प्रवास केवळ शासकीय कार्यालय ते निवासस्थान असाच असणे क्रमप्राप्त आहे. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास फौजदारी व दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
आॅनलाईन आवेदनानंतरही सादर करावा लागतो आॅफलाईन अर्ज
निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना सुविधा व्हावी या हेतूने आॅनलाईन आवेदन स्वीकारले जात आहेत. असे असले तरी उमेदवाराने आॅनलाईन आवेदन सादर केल्यानंतरही सदर अर्जाची प्रिंटआऊट तालुका कचेरीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करणे क्रमप्राप्त आहे.