दोन बॅटरीचोर गजाआड
By admin | Published: September 7, 2015 02:03 AM2015-09-07T02:03:52+5:302015-09-07T02:03:52+5:30
आर्वी नाका परिसरातून ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या लंपास करणाऱ्या गजानननगर येथील दोघांना अटक करण्यात आली.
सहा बॅटऱ्यांसह आॅटो जप्त : खरेदी करणारे दोघेही अटकेत
वर्धा : आर्वी नाका परिसरातून ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या लंपास करणाऱ्या गजानननगर येथील दोघांना अटक करण्यात आली. शिवाय त्यांच्याजवळून चोरीच्या बॅटऱ्या खरेदी करणाऱ्या महादेवपुरा येथील दोन भंगार व्यवसायिकांनाही अटक करण्यात आली आहे. या कारवाईत आॅटोसह चोरीच्या सहा बॅटऱ्या असा एकूण ८३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जावेद बब्बू शेख (२७) व मोसीन कासम शेख (१९) दोन्ही रा. गजानन नगर, वर्धा अशी बॅटरी चोरांची नावे आहेत. तर शेख नबी उर्फ नब्बू राशीद (५२) व अब्दुल अजीज उर्फ अज्जू अब्दुल मोहम्म (५४) दोन्ही रा. महादेवपुरा अशी खरेदी करणाऱ्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २ सप्टेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात किरण शंकर चौधरी (४१) रा. समर्थवाडी यांच्या दुकानासमोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या लंपास झाल्याची तक्रार करण्यात आली. या घटनेचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सदर गुन्ह्यात गजानननगर येथील जावेद शेख व मोसीन शेख यांचा सहभाग असल्याची माहिती मिळाली. या दोघांना ताब्यात घेत त्यांना विचारणा केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. शिवाय बॅटऱ्या नेण्याकरिता आॅटोचा वापर केल्याचे मान्य केले. यावरून जावेद शेख व मोसीन शेख या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून चोरीतील बॅटऱ्या खरेदी करणारे भंगार दुकानदाराला शेख नबी उर्फ नब्बू राशीद व अब्दुल अजीज उर्फ अज्जू अब्दुल मोहम्मद या दोघांनाही भादंविच्या कलम ४११ भादंवि अन्वये अटक करण्यात आली. या कारवाईत गुन्ह्यातील सहा बॅटऱ्या व आॅटो असा एकूण ८३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास शहर पोलिसांमार्फत सुरू आहे.(प्रतिनिधी)