एक ब्रास रॉयल्टीवर दोन ब्रासची वाहतूक
By admin | Published: April 19, 2017 12:35 AM2017-04-19T00:35:26+5:302017-04-19T00:35:26+5:30
जिल्ह्यात रेतीची चोरटी वाहतूक होणे काही नवे नाही. रॉयल्टी नसताना रेतीची वाहतूक होण्याचे प्रकार जिल्ह्यात समोर आले
वर्धा तहसीलदारांची कारवाई : पाच ट्रक कार्यालयात उभे
वर्धा : जिल्ह्यात रेतीची चोरटी वाहतूक होणे काही नवे नाही. रॉयल्टी नसताना रेतीची वाहतूक होण्याचे प्रकार जिल्ह्यात समोर आले असतानाच एका ब्रासच्या रॉयल्टीवर दोन ब्रासची वाहतूक करणारे पाच ट्रक वर्धेत जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई तहसीलदारांच्या मार्गदर्शनात मंगळवारी करण्यात आली.
कमी रॉयल्टीत अधिक रेतीची वाहतूक करणारे पाचही ट्रक तहसील कार्यालयाच्या आवारात उभे आहेत. त्यांना अतिरिक्त असलेल्या एक ब्रास रेतीची रॉयल्टी दंड म्हणून भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तर त्यांच्याकडून ही दंडाची रक्कम भरली नाही तर त्यावर या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे तहसीलदारांकडून सांगण्यात आले आहे. या दंडापोटी एका ट्रकचालकाला २५ हजार ४०० रुपये भरावे लागणार आहे. शहरातून होत असलेल्या रेती वाहतुकीची माहिती तहसीलदार मनोहर चव्हाण यांना कळताच त्यांनी अधिनस्थ नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठ्यांना या ट्रक चालकांवर कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार सकाळपासूनच मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत पाच ट्रक जप्त करण्यात आले. त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती तहसील कार्यालयातून मिळाली आहे.(प्रतिनिधी)