दोन प्रकरणात जि.प.अधिकाऱ्यांची माहिती आयोगासमोर सुनावणी
By admin | Published: September 18, 2016 12:48 AM2016-09-18T00:48:58+5:302016-09-18T00:48:58+5:30
शहरालगत असलेल्या ११ ग्रामपंचायतीचा मुद्दा सध्या विविध प्रकरणातून समोर येत आहे. यात शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसह काही
११ ग्रामपंचायतीतील प्रकरण : अधिकाऱ्यांना दिली आयोगाला उत्तरे
वर्धा : शहरालगत असलेल्या ११ ग्रामपंचायतीचा मुद्दा सध्या विविध प्रकरणातून समोर येत आहे. यात शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसह काही ग्रामविकास अधिकाऱ्यांची नागपूर येथे माहिती आयुक्तांसमोर सुनावणी झाली. दोनही प्रकरणात माहिती आयोगाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत पुरावेही सादर केले. यात सदर प्रकरणे लवकरात लवकर मार्गी काढण्याच्या सूचना माहिती आयुक्तांनी दिल्याचे प्रमोद मुरारका यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
पहिली सुनावणी जिल्हाधिकारी यांच्या सदर्भात होती. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जन माहिती अधिकारी व कार्यालय अधीक्षक प्रमोद कदम यांच्यासह कर्मचारी काटपाईले उपस्थित होते. या प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हा परिषदेच्या कार्यालयाला केलेला पत्रव्यवहार या बाबात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान जिल्हा परिषद वर्धाचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार हजर होते. यावेळी माहिती आयोगाने या प्रकरणाचा संबंध जिल्हा परिषदेशी असल्याने त्यांनी तक्रारींचा ठरावीक वेळेत निपटारा करावा व केलेल्या कार्यवाहीची माहिती या कार्यालयाला द्यावी, असे आदेश वजा निर्देश दिले. दुसरी सुनावणी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाची असल्याने या सुनावणीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे व जन माहिती अधिकारी देवढे यांची उपस्थिती होती.
अधिकाऱ्यांनी मांडली बाजू
वर्धा : सुनावणी दरम्यान अपिलार्थीने आपली बाजू प्रभावीपणे मांडली व ती माहिती आयोगाला लक्षात आल्याने आयोगाने अपिलार्थी यांच्या प्रकरणात तातडीने चौकशी समिती नेमावी व त्याचा ठराविक मुदतीत अहवाल मागून त्यावर नियमानुसार कार्यवाही करावी व त्याबाबतचे पत्र मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. वर्धा यांनी २७ सप्टेंबर २०१६ पर्यंत द्यावी. तसेच त्याची प्रत माहिती आयोग कार्यालयात देण्यात यावी, असे आदेश दिले. या सुनावणी दरम्यान माहिती आयोगासमोर उप विभागीय कार्यालयातर्फे नायब तहसीलदार महाजन, गट विकास कार्यालयातर्फे सहाय्यक गट विकास अधिकारी प्रज्ञा माने, आरोग्य पर्यवेक्षक हाते, जिल्हाधिकारी कार्यालयाचे वरिष्ठ लिपीक काटपायले, ११ ग्रा.पं.पैकी पिपरीचे ग्रामसेवक कैलास बर्धिया उपस्थिती होते.(प्रतिनिधी)