वर्ध्यात दोन व्यावसायिक प्रतिष्ठानांना आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 06:24 PM2019-12-16T18:24:51+5:302019-12-16T18:26:15+5:30
स्थानिक अंबिका चौकातील दोन व्यावसायिक प्रतिष्ठानांना रविवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत दोन्ही दुकानातील साहित्य कोळसा झाल्याने व्यावसायिकांचे सुमारे १७ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: स्थानिक अंबिका चौकातील दोन व्यावसायिक प्रतिष्ठानांना रविवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत दोन्ही दुकानातील साहित्य कोळसा झाल्याने व्यावसायिकांचे सुमारे १७ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना सुमारे पाच तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
प्राप्त माहितीनुसार, आशीष डोंगरे रा. कृष्णनगर व अनिल डाफे रा. नालवाडी यांच्या मालकीचे स्थानिक अंबिका चौक परिसरात व्यावसायिक प्रतिष्ठान आहे. याच दुकानांना रविवारी रात्री उशीरा आग लागल्याचे परिसरातील काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांसह वर्धा न.प.च्या अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वर्धा नगर परिषद, देवळी नगर परिषद, पुलगाव नगर परिषद आणि भूगाव येथील उत्तम गलवा कंपनीच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी अग्निशनम बंबासह घटनास्थळ गाठले. तसेच आगीवर पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. आगीने बघता-बघता सदर दोन्ही व्यावसायिक प्रतिष्ठानातील साहित्याला आपल्या कवेत घेत रौद्ररुप धारण केले होते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. अग्निशमन दलाच्या बंबांनी सुमारे १५ फेऱ्या केल्या. सकाळी ५ वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. अचानक लागलेली ही आग इतकी भीषण होती की आगीच्या दुरवर ज्वाळा दिसून येत होत्या. या घटनेची नोंद शहर पोलिसांनी घेतली आहे.
सकाळी उशिरापर्यंत धुमसली आग
रविवारी रात्री उशीरा लागेली आग सकाळी ११.३० वाजतापर्यंत धुमसत होती. आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर अग्निशमन दल तेथून निघून गेले. पण, सकाळी अकरा वाजताच्या सुमारास पुन्हा आग वाढल्याने अग्निशमन दलाचा एक बंब आला. त्यानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात आले.