दोन दिवसांत आरटीओची कमाई ९७ लाख
By admin | Published: April 7, 2017 02:04 AM2017-04-07T02:04:12+5:302017-04-07T02:04:12+5:30
न्यायालयाने बीएस इंजिनच्या गाड्यांची विक्रीबंद करण्याचा निर्णय घेताच विविध कंपनीच्यावतीने मोठ मोठ्या आॅफर देत वाहनांची विक्री केली.
बीएस ३ इंजिनबंदी : ८८७ वाहनांची नोंदणी; रात्री उशिरापर्यंत केले कर्मचाऱ्यांनी काम
रूपेश खैरी वर्धा
न्यायालयाने बीएस इंजिनच्या गाड्यांची विक्रीबंद करण्याचा निर्णय घेताच विविध कंपनीच्यावतीने मोठ मोठ्या आॅफर देत वाहनांची विक्री केली. या आॅफरमधून वर्धेत तब्बल ८८७ वाहनांची विक्री झाली तर नोंदणी शुल्कातून उपप्रादेशिक परिवहन विभागाचीही बक्कळ कमाई झाली. निर्णयाच्या दोन दिवसात वाहनांच्या नोंदणी शुल्कातून विभागाला तब्बल ९७ लाख ३ हजार ७७९ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. दोन दिवसातील ही रक्कम आरटीओ कार्यालयाच्या रोजच्या सरासरी महसूलाच्या सातपट असल्याचे विभागाच्या रोजच्या महसूलावरून दिसत आहे.
प्रदूषणाच्या कारणाने न्यायालयाने बीएस ३ इंजिन असलेल्या दोनचाकी आणि चारचाकी नव्या वाहनांची विक्रीबंदी जाहीर केली. न्यायालयाचा निर्णय जाहीर होताच विविध कंपनींकडून दुचाकीसह चारचाकी वाहनांवर मोठ मोठ्या आॅफर जाहीर केल्या. यात चारचाकी वाहनांचाही समावेश होता. आॅफर मिळताच नागरिकांनीही दुचाकी खरेदी करण्याचा सपाटा सुरू केला. बंदीच्या दोन दिवसांपैकी ३० मार्चला वर्धेत २७९ दुचाकी वाहनांची नोंदणी झाली. या एका दिवसात १३ लाख ५१ लाख ७०० रुपये तर ३१ मार्च रोजी ६०८ वाहनांची नोंदणी झाली. या दिवशी उप प्रादेशिक परिवहन विभागाला तब्बल ८३ ला ५१ हजार ९८९ रुपयांचा महसूल मिळाला आहे. बंदी जाहीर होताच नागरिकांकडून वाहन खरेदीचा सपाटा सुरू केला. वाहनाच्या नोंदणीकरिता एकच दिवस असल्याने नागरिकांच्या वाहनांची नोंदणी करण्याकरिता उपप्रादेशिक परिवहन विभागही सरसावला. या दिवसात कधी नव्हे तो उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ओव्हरटाईम केला. त्यांनीही रात्री उशिरापर्यंत एकाच दिवशी खरेदी झालेल्या वाहनांची नोंद केली. या दोन दिवसात उप प्रादेशिक परिवहन विभागाचे काही अधिकारी ठराविक शोरूमध्ये ठिय्या मांडून असल्याची चर्चा वर्धेत आहे. यामुळे विभागाच्या कमाईसह काही अधिकाऱ्यांचीही कमाई यात झाल्याची चर्चाही जोरात आहे.
सरासरी उत्पन्नाच्या सातपट कमाई
वर्धेच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाचे महिन्याचे सरासरी उत्पन्न ३ कोटी रुपये असल्याचे विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. यात विभागात महिन्याच्या ३० दिवसांपैकी एकूण २२ दिवस होते. यात एका दिवसाची सरासरी कमाईचा विचार केल्यास १३ लाख ६३ हजार ६३६ रुपये होते. तर या दोन दिवसात विभागाची तब्बल ९७ लाख ३ हजार ७७९ रुपयांचा महसूल जप्त केला. हा महसूल रोजच्या महसूलाच्या तब्बल सातपट आहे. यामुळे उप प्रादेशिक परिवहन विभागाचे यंदाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
नोंदणीकरिता आरटीओही उदार
कधी एका दिवसात सणाचे दिवस वगळता सरासरी ५० ते ६० गाड्यांची नोंदणी करणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन विभागाचेही कर्मचारीही या दोन दिवसात बरेच उदार झाल्याचे दिसून आले. रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबत त्यांनी जेवढ्या गाड्यांची विक्री झाली तेवढ्याही गाड्यांची कुठलीही टाळाटाळ न करता नोंदणी करून घेतली. यामुळे वर्धेतील आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या या कर्तव्यदक्षतेची सर्वत्र चर्चा होत आहे.