अन् ५० फूट खोल विहिरीतून 'त्या' दोघांचे मृतदेहच निघाले; गावावर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 11:13 AM2023-03-03T11:13:51+5:302023-03-03T11:15:56+5:30
२५ तासांच्या बचावकार्यानंतर निराशाच
सिंदी (रेल्वे)(वर्धा) : जिल्ह्यातील सिंदी (रेल्वे) लगतच्या गौळ (भोसा) शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये विहिरीचे बांधकाम सुरू असतानाच अचानक ५० फूट खाेल विहीर खचल्याने त्याच्या मलब्याखाली दोन मजूर दबले. ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजता घडली होती. घटनेनंतर दोन्ही मजुरांना बाहेर काढण्याकरिता मोठी यंत्रणा कामी लागली होती. अखेर २५ तासांच्या अथक परिश्रमानंतर दोघांचेही मृतदेहच बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सर्जेराव वरभे रा. गौळ (भोसा) यांनी शेतामध्ये ५ वर्षांपूर्वी विहीर खोदली होती. त्यांच्या शेतातील विहिरीच्या बांधकामाचा ठेका सिंदी येथील अमोल टेंभरे यांना देण्यात आला होता. ५० फूट खोल विहिरीच्या वरच्या भागातील ३० फूट उंचीचे बांधकाम रिंग टाकून केल्या जात होते. ३ रिंगाचे बांधकाम पूर्ण झाले होते. अमोल टेंभरे, पंकज खडतकर, मयूर टेंभरे, मनोज टेंभरे व गणेश वरभे हे मजूर बांधकाम करीत होते. चौथी रिंग टाकण्याचे काम सुरू असताना अमोल दशरथ टेंभरे (३६) व पंकज प्रभाकर खडतकर (२८) हे विहिरीच्या आत तर इतर मजूर बाहेर काम करीत होते.
दरम्यान वर काम करणाऱ्या मजुरांना सिमेंट काँक्रीटची रिंग फाटत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आत असलेल्या दोन्ही मजुरांना ताबडतोब बाहेर येण्याची सूचना केली. त्यामुळे दोन्ही मजूर दोराच्या मदतीने वर येत असताच रिंग फाटली आणि त्याचा मलबा कोसळल्याने अमोल टेंभरे व पंकज खडतकर हे दोघेही मजूर आत दबल्याचे इतर मजुरांनी सांगितले.
माहिती मिळताच सिंदीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. तसेच समुद्रपूरचे तहसीलदार राजू रणवीर हेसुद्धा महसूल विभागाच्या पथकासह दाखल होऊन मलबा काढण्यासाठी तीन जेसीबींच्या साहाय्याने प्रयत्न सुरू केले. रात्री अंधार पडायला लागल्याने बचावकार्य थांबविण्यात आले.
गुरुवारी सकाळपासून पुन्हा जेसीबीच्या साहाय्याने बचावकार्य सुरू केले. अखेर दुपारी २ वाजताच्या दरम्यान एक मृतदेह सापडला. त्यानंतर ४ च्या दरम्यान दुसरा मृतदेह आढळून आला. यावेळी समुद्रपूरचे तहसीलदार राजू रणवीर, सेलूचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांच्यासह त्यांच्या कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त होता. घटनास्थळी नागरिकांचीही मोठी गर्दी होती.