विजेच्या धक्क्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू
By admin | Published: October 11, 2014 02:01 AM2014-10-11T02:01:04+5:302014-10-11T02:01:04+5:30
शेतात कामानिमित्त गेलेल्या दोन शेतकऱ्यांचा वेगवेगळ्या घटनेत विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.
तळेगाव (श्यामजीपंत), आकोली : शेतात कामानिमित्त गेलेल्या दोन शेतकऱ्यांचा वेगवेगळ्या घटनेत विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. त्यातील एक घटना तळेगाव (श्या.पं.) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जळगाव तर दुसरी घटना सेलू पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या तामसवाडा शिवारात घडली. नरेश किसन बोरवार (२७) रा. कोपरा पुनर्वसन आणि पुरूषोत्तम गोपाल कोरडे (४२) अशी मृतकांची नावे आहेत.
जळगाव शिवारात झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू लपविण्याकरिता शेतमालकाने त्याचा मृतदेह एका प्लासिटकच्या थैलीत ठेवल्याने हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी सायंकाळच्या सुमारास जळगाव शिवारात नरेश बोरवार हा हरिराम निमनकर यांच्या शेताच्या धुऱ्याने जात होता. यावेळी निमनकर यांच्या पऱ्हाटीच्या शेतात शेतमजूर रामचंद्र आतराम रा. नांदोरा पुनर्वसन याने तारांच्या कुंपणाला विजेचा प्रवाह सुरू ठेवला होता. या तारांना नरेश बोरवारचा स्पर्श होताच त्याला विजेचा जोरदार झटका लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी प्लास्टिकच्या थैलीमध्ये प्रेत टाकून ठेवण्यात आले. सदर घटनेची माहिती पोलीस पाटलांना मिळताच त्याने तळेगाव पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत प्रकरणाचा पंचनामा केला. सदर घटनेचा तपास सुरू आहे.
दुसऱ्या घटनेत पुरूषोत्तम गोपाल कोरडे (४२) रा. चांदणी (बोथली) ता. आर्वी, हल्ली मुक्काम तामसवाडा याने दत्तूजी कौरती यांचे शेत मक्त्याने केले होते. शेतात विजेच्या खांबावर लोखंडी तारांच्या साहाय्याने त्याने लाईट लावले होते. सकाळीच तो स्प्रिंकलरचे पाईप बदलविण्यासाठी गेला होता. दुपारपर्यंत घरी न आल्याने शेतात जाऊन बघितले असता, तो मृतावस्थेत आढळला. वीज प्रवाहित लोखंडी ताराला त्याचा स्पर्श होऊन तो जागीच ठार झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी ठाणेदार संतोष बाकल यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनेचा तपास सुरू आहे. (वार्ताहर)