जिल्ह्यात आगीच्या दोन घटना
By admin | Published: April 23, 2017 02:05 AM2017-04-23T02:05:23+5:302017-04-23T02:08:41+5:30
गुरुवाडी परिसराच्या मागील शेताकडून अकस्मात दुपारला आग लागली. आगीने रौद्ररुप धारण केले होते.
सेलूत दोन घरे भस्मसात : सेवाग्राम येथे बकरी व कोंबड्या भक्ष्यस्थानी
सेवाग्राम : गुरुवाडी परिसराच्या मागील शेताकडून अकस्मात दुपारला आग लागली. आगीने रौद्ररुप धारण केले होते. परिसरातील नागरिकांनी पाणी टाकून आणि वर्धा न.प.च्या अग्निशामक दलाने आग विझविली. यात घर, गोठा, कुटार, खत आणि काही प्राणी जळाले. ही घटना शनिवारी दुपारी घडली.
आगीची माहिती मिळताच जिल्हा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली होती. माहिती मिळताच आ. रणजित कांबळे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. ते आग लागली त्या काळापासून आग आटोक्यात येईपर्यंत घटनास्थळीच हजर होते. या आगीत घरातील साहित्याचा कोळसा झाला असून शासकीय मदतीची मागणी आहे. गुरुवारी परिसरातील दिलीप साठोणकर घराची सफेदी करीत होते. त्यांना अचानक आगीचा भडका दिसला. यामुळे त्यांनी घटनास्थळाकडे आरडा ओरड करीत धाव घेतली. पाहणी केली असता शेर खॉ पठाण यांच्या घराला आग लागल्याचे दिसले. यावेळी घरात शहनाज शेख (४०) ही महिला झोपलेली होती. तिला उठविण्यात आले. तोपर्यंत घराचे शेड जळून खाक झाले. अजीज शेख (४५) यांचा जनावरांचा गोठा, कुटार, खत आगीच्या भक्षस्थानी आले. त्यांची एक गाय जखमी झाली. शेर खॉ पठाण यांची बकरी, कोंबड्या जळाल्या. घराच्या शेड मधील कपडे व इतर साहित्य जळाले, निळकंठ थोटे यांच्या घराच्या स्लॅबवर कुटार, तुराट्या ठेवून होत्या. एका ठिणगीने कुटार जळायला लागल्याने युवकांनी पाण्याचा मारा करून ते विझविले. धनराज समर्थ यांच्या घरावरील पोत्यांनीही पेट घेतला होता. गुरुवाडी परीसर गावाचा शेवटचा भाग आहे. मोकळा परिसर व झाडे, वाळलेले गवत आहे. शेतातून गेलेल्या वीज तारांमुळे आग लागल्याची चर्चा आहे. नागरिकांनी घरातील सिलिंडर मुख्य मार्गावर व लांब नेवून ठेवले होते. गुरुवाडी पेटले की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. अग्निशामक दलाने नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले. तहसीलदार मनोहर चव्हाण, ठाणेदार भानुदास पिदुरकर, दिलीप किटे, सरपंच रोशना जामलेकर, आश्रम प्रतिष्ठानचे मंत्री प्रा. डॉ. श्रीराम जाधव, सुनील कोल्हे, तलाठी सदानंद जटाळे आदींनी पाहणी केली.(वार्ताहर)