कृषीच्या वीज पुरवठ्यात दोन तासांची कपात
By admin | Published: May 9, 2017 01:03 AM2017-05-09T01:03:14+5:302017-05-09T01:03:14+5:30
राज्यात वीज निर्मिती कमी झाल्याने भारनियमनात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.
गावांनाही भारनियमनाचे चटके : महावितरणने लक्ष देण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्यात वीज निर्मिती कमी झाल्याने भारनियमनात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. वीजे अभावी गावाकऱ्यांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. तर पुरेसा पुरवठा होत नसल्याने कृषी क्षेत्राच्या वीज पुरवठ्यात दोन तासांनी कपात करण्यात आली आहे.
पूर्वी कृषी क्षेत्राकरिता १० तास वीज देण्यात येत होती. ती आता आठ तास करण्यात आली आहे. यात रात्री आठ आणि दिवसा आठ तास नियमित वीज देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वास्तविकतेत मात्र दिवस सोडा रात्रीही वीज राहत नसल्याचे दिसून आले आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे दिसून आले आहे. वीज निर्मितीत वाढ होईपर्यंत नागरिकांना भारनियमनाचे चटके सहन करावे लागत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. पिकांना पाणी मिळत नसल्याने भाजीवर्गीस पिके संकटात आली आहेत.
पवनारात केळीच्या बागा संकटात
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : पवनार परिसरात गत काही दिवसांपासून भारनियमनाने डोके वर काढले आहे. परिणामी शेतकऱ्यांना ओलीत करणे अवघड जात आहे. यामुळे वाढते उन्हाचा फटका शेतकऱ्यांना बसत असून पिके कोमेजत आहे. आता महावितरणही शेतकऱ्यांच्या जीवावर उठणार काय, असा प्रश्न होत आहे.
या गावात कृषी फिडरचाच नाही तर गावातील वीज पुरवठाही नेहमी खंडीत होत असल्याचे दिसून आले. यामुळे गावकऱ्यांना भर उन्हात घरी चटके सहन करण्याची वेळ आली आहे.
या भागात बागायतदार शेतकरी आहेत. अनेकांच्या शेतात केळीचे पीक आहे. सध्या ते लहान असल्याने त्याला पाण्याची गरज आहे. परंतु येथे भारनियमन असल्याने या पिकांना पाणी देण्याकरिता शेतकऱ्यांची चांगलीच अडचण आहे. शासनाने दिलेल्या सिंचनाच्या सुविधेमुळे पाणी उपलब्ध आहे. मात्र वीज पुरवठा नसल्याने पाणी असताना ते पिकांना देणे कठीण झाले आहे. पाणी नसल्याने तळपत्या उन्हामुळे पीक करपण्याच्या मार्गावर आहे. यात शेतकऱ्यांवर संकट कोसळण्याची शक्यता आहे. उन्हामुळे शेतात असलेली केळीचे झाडे जळत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना ओलिताकरिता नियमित वीज पुरवठा करावा अशी मागणी होत आहे.
वीज निर्मितीत घट होत आहे. शिवाय जिल्ह्यात वादळ जोर काढत आहे. यामुळे काही काळ वीज पुरवठा खंडीत झाला होता. मात्र आता तो सुरळीत झाला आहे. पवनार भागात कृषी पंपांना नियमित वीज मिळत आहे.
- सुनील देशपांडे, अधीक्षक अभियंता, महावितरण वर्धा