आगीत दोन घराचे नुकसान; म्हशीही जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:25 AM2018-10-11T00:25:08+5:302018-10-11T00:26:10+5:30
येथील केशव चोपडे यांच्या घराला बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागली. यात त्यांच्या घरातील संपूर्ण साहित्य जळून कोळसा झाले. तर प्रभाकर कामडी यांचे घराचे अशंत: नुकसान झाले. ही आग शॉटसर्कीटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलगाव (लवणे) : येथील केशव चोपडे यांच्या घराला बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागली. यात त्यांच्या घरातील संपूर्ण साहित्य जळून कोळसा झाले. तर प्रभाकर कामडी यांचे घराचे अशंत: नुकसान झाले. ही आग शॉटसर्कीटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
बुधवारी दुपारी चोपडे यांच्या घरातून धूर निघत असल्याचे परिसरातीलच पुंडलिक धोटे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडा-ओरड करून इतरांना माहिती दिली. याप्रसंगी चोपडे कुटुंबातील सदस्य घरात नसल्याचे व घराला कुलूप असल्याचे दिसल्यावर परिसरातील आगीवर पाण्याचा मारा करून नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने बघता-बघता चोपडे यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्याला आपल्या कवेत घेतले होते. सुमारे तासभऱ्याच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाल्याने चोपडे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आगीमुळे प्रभाकर कामडी यांच्या घराचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीत दोन म्हशी भाजल्या गेल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाच्या अधिकाºयांसह महावितरणचे सहाय्यक अभियंता मोगरे यांनी उपल्या चमुसह घटनास्थळ गाठले. मंडळ अधिकारी वाघाडे व तलाठी आडे यांनी पंचनामा केला. ही आग शॉर्टशर्कीटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. नुकसानग्रस्ताला शासकीय मदत देण्याची मागणी आहे.
युवकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
आग लागल्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. याच वेळी परिसरातील काही युवकांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता चोरटे यांच्या घरात प्रवेश करून घरातील गॅस सिलिंडर बाहेर काढले. यामुळे पुढील अनर्थ टळला.