आगीच्या भडक्यात दोन घरे खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 11:26 PM2018-04-02T23:26:02+5:302018-04-02T23:26:02+5:30
तालुक्यातील परसोडा गावामध्ये रविवारी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान अचानक आग लागून दोन घरे जळून खाक झाली. यावेळी घरी कोणी नसल्याने जीवितहानी टळली. असे असले तरी घरातील संपूर्ण साहित्याचा कोळसा झाला. यात सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : तालुक्यातील परसोडा गावामध्ये रविवारी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान अचानक आग लागून दोन घरे जळून खाक झाली. यावेळी घरी कोणी नसल्याने जीवितहानी टळली. असे असले तरी घरातील संपूर्ण साहित्याचा कोळसा झाला. यात सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
तालुक्यातील परसोडा येथील रामचंद्र बळीराम जमदापुरे व नत्थुजी नामदेव ठाकरे यांच्या घराला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली. रामचंद्र जमदापुरे यांचे संपूर्ण घरासह बारा पोते गहु, तांदूळ, कपडे, दिवान, घरघुती साहित्य असे एकूण जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. तर त्यांच्या शेजारी असलेल्या नत्थुजी ठाकरे यांच्या घरातील वीस कट्टे तूर, ४३ पोते गहु, दाळ, घरातील जीवनोपयोगी साहित्याचा कोळसा झाला. त्यांचे संपूर्ण घर असे यात खाक झाले. या आगीत त्यांचे जवळपास तीन लाखांचे नुकसान झाले. दोन्ही आगीच्या घटनेमध्ये प्रसंगावधानाने जीवितहानी झाली नाही. गावातील नागरिकांनी प्रयत्नपुरक आग विझविण्यात मदत केली.
तालुक्यात आगीच्या घटनांमध्ये विलक्षण वाढ झाली आहे. यापुर्वी समुद्रपूर, तास, नारायणपूर, गिरड येथे आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. आगग्रस्त कुटुंबियांना त्वरीत शासकीय मदत देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.