खर्डीपुऱ्यातील दोन घराला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 09:32 PM2019-06-14T21:32:17+5:302019-06-14T21:32:43+5:30
येथील खर्डीपुरा भागातील जुन्या वस्तीतील दोन घरांना अचानक आग लागली. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याचा अंदाज असून यात बंडू आमझिरे व शेषराव आमझीरे यांच्या घरातील संसारउपयोगी साहित्य जळून कोळसा झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : येथील खर्डीपुरा भागातील जुन्या वस्तीतील दोन घरांना अचानक आग लागली. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याचा अंदाज असून यात बंडू आमझिरे व शेषराव आमझीरे यांच्या घरातील संसारउपयोगी साहित्य जळून कोळसा झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना गुरूवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.
गुरूवारी आ. अमर काळे हे भूमीपुजनाच्या कार्यक्रमानिमित्त खर्डीपुरा परिसरात आले होते. सदर कार्यक्रम सुरू असताना आमझीरे यांच्या घरातून धूर निघत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर झालेल्या आरडा-ओरड नंतर ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. शिवाय मशीद जवळील विहिरीवरील मोटारपंप सुरू करून आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला. आ. अमर काळे यांनी नियोजित कार्यक्रम बाजूला सारून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पुढाकार घेतला होता. शेषराव आमझीरे यांच्या घरात भरलेली दोन गॅस सिलिंडर असल्याची माहिती पुढे येताच काहींनी मोठ्या धाडस करीत सदर गॅस सिलिंडर तातडीने घराबाहेर काढले. तब्बल १ तासांच्या प्रयत्नाअंती आगीवर नियंत्रण मिळविण्यात नागरिकांना यश आले. ज्या परिसरात आग लागली तो परिसर दाट लोकवस्तीचा आहे. वेळीच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने पुढील अनर्थ टळला. माहिती मिळताच तलाठी महेश कावरे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेमुळे आमझीरे बंधुचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.