दोन अपघातात दोन ठार; एक गंभीर
By Admin | Published: June 7, 2017 12:29 AM2017-06-07T00:29:11+5:302017-06-07T00:29:11+5:30
जिल्ह्यात हिंगणघाट व केळापूर येथे झालेल्या दोन वेगवेळ्या घटनेत दोन जण जागीच ठार झाले.
केळापूर व हिंगणघाट येथील घटना : गंभीर जखमीवर सेवाग्रामात उपचार
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात हिंगणघाट व केळापूर येथे झालेल्या दोन वेगवेळ्या घटनेत दोन जण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला.
देवळी-पुलगाव मार्गावर केळापूर शिवारात दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव स्कॉर्पिओ उलटली. यात स्कॉर्पिओ मधील एक जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. निलेश निपाने असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुलगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळ गाठत पंचनामा केला. दुचाकी चालक कुणाल खंडारे याच्या तक्रारीवरुन स्कॉर्पिओ क्रमांक एमएच ४९ बी.७१०० च्या चालकावर कलम २७९, ३०४(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
महिन्यापूर्वी झाला होता मृताचा विवाह
हिंगणघाट - येथील राष्ट्रीय महामार्गावरील नंदोरी चौक उड्डाण पुलाजवळच्या एका अज्ञात सिमेंट मिक्सर टँकरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात अतुल गजभिये यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री घडली. अतुल गजभिये असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतकाचा एक महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. येथील मोहता बगीच्या जवळच्या म्हाडा कॉलनीतील अतुल गजभिये (२६) बाजारात खरेदी करुन घरी परत जात असतांना हा अपघात घडला. या अपघातात त्यांच्या मोटरसायकलवर मागे बसुन असलेली दिक्षीता धारणे (१९) गंभीर जखमी झाली. जखमीवर उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.