दुचाकी अपघातात दोन ठार, एक गंभीर
By admin | Published: September 8, 2015 04:11 AM2015-09-08T04:11:12+5:302015-09-08T04:11:12+5:30
वर्धा मार्गावरील दहेगाव (गावंडे) शिवारात दुचाकींत जबर धडक झाली. यात दोघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी
नाचणगाव : वर्धा मार्गावरील दहेगाव (गावंडे) शिवारात दुचाकींत जबर धडक झाली. यात दोघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. दोन मृतकांपैकी एकाची ओळख पटली असून दुसऱ्याची ओळख अद्याप पटली नाही.
मनोज चंदनखेडे (३०) रा. चितोडा असे एका मृतकाचे नाव आहे. तर दुसऱ्याची अद्याप ओळख पटली नाही. दुसऱ्या मृतकाच्या हातावर गजानन नावासह इंग्रजीत जीएम असेही गोंदले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यातील जखमीचे नाव दीपक व्यकंट हर्षे (३२) असे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलीस सुत्रानुसार, अमरावती येथून मनोज चंदनखेडे व दीपक हर्षे हे दोन युवक नव्या कोऱ्या दुचाकीने येत होते. दरम्यान त्यांच्या दुचाकीची दुसऱ्या दुचाकीशी जबर धडक झाली. यात दुचाकीस्वार मनोज चंदनखेडे याचा मृत्यू झाला. तर चालक दीपक हर्षे जखमी झाला. दुसऱ्या वाहनावरील एक व्यक्ती जागीच ठार झाला. तर चालक वाहन घेवून पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच देवळी पोलीस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक संजय कापसे यांनी घटनास्थळ गाठत पंचनाम करून दोन्ही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेतनासाठी पाठविले. प्रकरण पुलगाव ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने ते त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. प्रकरणाचा तपास पुलगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक विठ्ठल दुधकोहळे तसेच राजू कुरसंगे करीत असल्याची माहिती आहे.(वार्ताहर)
मृतदेह रुग्णालयात
४अद्याप अनोळखी असलेला मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. त्याच्या हातावर गजानन व जीएम असे गोंदलेले असल्याचे पोलिसांनी सांगितले.