कार-दुचाकीच्या अपघातात दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 10:29 PM2018-09-28T22:29:46+5:302018-09-28T22:30:24+5:30
येथील महामार्ग ६ वरील पेट्रोलपंपा समोर कार व दुचाकीच्या अपघात झाला. यात दुचाकीवरील दोन ठार व एक गंभीर जखमी झाला. गंभीर जखमीला नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : येथील महामार्ग ६ वरील पेट्रोलपंपा समोर कार व दुचाकीच्या अपघात झाला. यात दुचाकीवरील दोन ठार व एक गंभीर जखमी झाला. गंभीर जखमीला नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात दुपारी चार वाजता झाला असून कार मधील पाच प्रवासी थोडक्यात बचावले.
प्राप्त माहितीनुसार, एम. एच. ३२ एच. ९५२४ क्रमांकाच्या दुचाकीने तिघे जण कारंजाकडून महामार्गावरील पेट्रोलपंपावर वाहनात इंधन भरण्यासाठी जात होते. पेट्रोलपंप उजव्या बाजूला असल्याने दुचाकी चालकाने आपल्या ताब्यातील वाहन उजवीकडे वळविली असता कोंढाळीकडून येणाऱ्या एम. एच. ३२ सी.९०२४ क्रमांकाच्या कारने दुचाकीला जबर धडक दिली. अपघात होताच कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व कार रस्त्याकडेला असलेल्या शेतात घूसली. अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चुराडा झाला व कारचेही नुकसान झाले. या अपघातात दुचाकीवरील अमोल दुपारे (२४) रा इंदिरानगर कारंजा याचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या सोनू उर्फ अमर श्रीरामे (२५) व सतीश कालभूत (२४) रा. सेलगाव याला सुरूवातीला कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणीअंती सोनू उर्फ अमर श्रीराम याला वैद्यकीय अधिकाºयांनी मृत घोषित केले. तर सतीश याची प्रकृती नाजूक असल्याने त्याला नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. लक्ष्मण भलावी, मनिषा लक्ष्मण भलावी, मुलगाव अभय (११), मुलगी नंदीनी (९) व बहिण कविता सलाम (४०) हे कार मध्ये होते. ते एका घरगुती कार्यक्रमासाठी शिवा (अडेगाव) ता. काटोल येथून आष्टीला बहिणीकडे जात होते. दरम्यान हा अपघात झाला असून ते थोडक्यात बचावले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिसरातील नागरिकांच्या मदतीने गंभीर जखमींना मिळेल त्या वाहनाने रुग्णालयाकडे रवाना केले. या घटनेची नोंद कांरजा पोलिसांनी घेतली आहे.
ट्रकने दुचाकी चालकास चिरडले
वर्धा : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. हा अपघात शहरानजीकच्या शांतीनगर चौकात शुक्रवारी सकाळी १०.५० वाजताच्या सुमारास झाला. माधव हनुमान ठाकरे (२४) रा. उमरी (मेघे) असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राप्त माहितीनुसार, मृतक माधव ठाकरे व रामदास चरडे रा. उमरी हे कामासाठी वर्धेच्या दिशेने जात होते. सायकने वर्धा शहरात पोहोचलेला रामदास चरडे भरपूर वेळ होऊनही माधव न पोहोचल्याने आणि त्याच्याशी मोबाईलवर संपर्क न होत असल्याने पुन्हा गावाच्या दिशेने निघाला. त्यावेळी त्याला शांतीनगर परिसरात अपघात झाल्याचे निदर्शनास आले. त्याने बारकाईने पाहणी केली असता माधव हा जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून असल्याने दिसून आले. त्याने घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देताच सहाय्यक फौजदार शंकर भलावी यांनी आपल्या चमुसह घटना स्थळ गाठून जखमीला मिळेल त्या वाहनाने सावंगी रुग्णालयाकडे रवाना केले. तेथे उपचारादरम्यान माधवचा मृत्यू झाला. माधव हा एम.एच. ३२ व्ही. ४९८० क्रमांकाच्या दुचाकीने वर्धेकडे येत असता त्याला भरधाव असलेल्या डब्ल्यू. बी. १५ बी. ७३४९ क्रमांकाच्या ट्रकने धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला.